दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
By Admin | Updated: August 9, 2014 00:33 IST2014-08-08T23:08:32+5:302014-08-09T00:33:00+5:30
अंबाजोगाई : खोटा चेक देऊन ड्रॉमध्ये लागलेली दुचाकी न दिल्यामुळे दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबाजोगाई न्यायालयाने शहर ठाण्याच्या पोलिसांना दिले ओहत.

दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
शेख इमाम शेख इनायतअली (रा. साकूड) व प्रदीप जोगदंड ( रा. मिलिंद नगर, अंबाजोगाई) असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथील सतीश दरवेशवार यांना शेख इमाम शेख इनायतअली व प्रदीप जोगदंड यांनी स्वत:च्या इच्छापूर्ती होम अप्लायसेंस कंपनी बाबत माहिती देऊन त्यांना कंपनीचे सभासद (क्र. ००००५७) करून घेतले होते. त्यानंतर सहाव्या हप्त्यात सतीष दरवेशवार यांना हिरो होंडा सी. डी. डिलक्स ही दुचाकी लागली होती. ती आरोपींनी मुदतीत न दिल्यामुळे दरवेशवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी आरोपींनी शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर तडजोडपत्र लिहून दुचाकी ऐवजी ३२ हजार रुपयांचा चेक दिला होता. तो चेक वटविण्यासाठी दरवेशवार बँकेत गेले असता यावेळी आरोपीच्या खात्यात रक्कमच नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दरवेशवार यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली होती. यावेळी सदर प्रकरणावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दरवेशवार यांनी न्यायालयात ४२०, ४२३, ४६५ ते ४७१, ३४ भादविनुसार फिर्याद दिली. त्यानंतर आरोपी शेख इमाम शेख इनायत अली व प्रदीप जोगदंड या दोघांवर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्याय एस. व्ही. भुतके यांनी दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. व्ही. डी. शिंदे, अॅड. एस. एस. व्यवहारे, अॅड. पी. एम. जोगदंड, अॅड. एम. एम. कलशेट्टी, अॅड. जे. एम. पटेल यांनी काम पाहिले. (वार्ताहर)