औरंगाबाद : ‘तडप’ सिनेमाचे ट्रेलर पाहून मित्रांनी दिलेले चॅलेंज स्वीकारत प्रेयसीसोबत धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या लव्हर बॉयची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रकाशित झाली. या बातमीची दखल घेत जिन्सी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लव्हर बॉयला मंगळवारी अटक केली.
सूरज गौतम कांबळे (२३, रा. अलोकनगर, बीड बायपास परिसर) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री त्याने मित्रांसोबत ‘तडप’ सिनेमाचे ट्रेलर पाहिले. हे ट्रेलर पाहिल्यानंतर तो मित्रांसोबत क्रांती चौकात आला. मित्रांनी त्याला धावत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत स्टंट करण्याचे चॅलेंज दिले. त्यानेही हे चॅलेंज स्वीकारत क्रांती चौक परिसरात राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला बोलावून घेतले. यानंतर दोघेही मोटारसायकलवर बसून अश्लील चाळे करत आमनेसामने चिटकून बसले. क्रांती चाैक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौक असा प्रवास त्यांनी केला. त्यांच्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले.
या वृत्ताची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यावर हे काय सुरू आहे, असे म्हणत कारवाईचे निर्देश जिन्सी पोलिसांना दिले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक अनंता तांगडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून अवघ्या २४ तासांत लव्हर बॉयला ताब्यात घेतले. पो. कॉ. संतोष बमनावत यांनी त्याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली. भादंवि २७९ (धोकादायक वाहन चालविणे), कलम ३३६ (दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या जीविताला धोका होईल असे वाहन चालविणे), मोटार वाहन कायदा कलम १८४ बेदरकारपणे वाहन चालविणे, मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११७ यानुसार गुन्हा नोंदविला.
कोण आहे हा लव्हर बॉय?सूरज सूतगिरणी चौकातील एका कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. शिवाय शहरातील एका कॉलेजमध्ये तो सध्या एम.ए.चे शिक्षण घेतो. त्याचे वडील गवंडी आहेत. त्याची १९ वर्षीय प्रेयसी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्याची ती नातेवाईक असून ते लग्न करणार असल्याचे सूरजने पोलिसांना सांगितले.