मतमोजणी एका छताखाली
By Admin | Updated: September 11, 2014 00:23 IST2014-09-11T00:17:00+5:302014-09-11T00:23:06+5:30
बीड : जिल्ह्यातील ६ विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच छताखाली बीड येथे होणार आहे़

मतमोजणी एका छताखाली
बीड : जिल्ह्यातील ६ विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच छताखाली बीड येथे होणार आहे़ आचारसंहिता लागलेली नसली तरी जिल्हा प्रशासनाने अंतर्गत तयारी सुरू केलेली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
सहा विधानसभा व एक लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच ठिकाणी म्हणजे बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे़ येथील जागेची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी देखील केली आहे़ कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते़ यामुळे प्रशासन सतर्क असल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या होत होत्या, परंतु यावेळी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रीत आलेल्या आहेत़ संबंधीत तहसीलदार व इतर यंत्रणा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी वापरणे शक्य नाही़ यामुळे मनुष्यबळाचा अभाव भासेल़ यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एकाच छताखाली करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांनी सांगितले़
प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे
जिल्हा प्रशासनाने मतमोजणी करावयाच्या प्रस्तावित जागेची पहाणी केलेली आहे़ याबाबतचा प्रस्ताव देखील बनविण्यात आलेला आहे़ निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर परवानगी घेण्यात येणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)