निकालाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू!
By Admin | Updated: May 14, 2014 00:40 IST2014-05-14T00:39:31+5:302014-05-14T00:40:01+5:30
जालना : लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचा अंतिम निकाल शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत हाती येईल, असा अंदाज जिल्हा निवडणूक विभागाने वर्तविला आहे.

निकालाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू!
जालना : लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचा अंतिम निकाल शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत हाती येईल, असा अंदाज जिल्हा निवडणूक विभागाने वर्तविला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच जिल्हा निवडणूक विभागाने सर्वतोपरी जय्यत तयारी सुरू केली आहे. विशेषत: मतमोजणीकरीता विविध विभागांतर्गत अधिकार्यांसह सुमारे ४०० वर कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या सर्वांना या विभागाने प्रशिक्षण दिले असून, हे सर्व अधिकारी- कर्मचारी या मतमोजणीच्या प्रक्रियेत पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात ही मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जालना, भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, पैठण, फुलंब्री या सहा विधानसभा मतदारसंघातील १७४१ बुथवरील मशिन्सची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. मतमोजणीच्या जवळपास २५ फेर्या होतील, असा अंदाज आहे. जालना, भोकरदन आणि पैठण या तीन विधानसभेच्या प्रत्येकी २२ फेर्या होणार आहेत, सिल्लोडच्या २१ व फुलंब्री विधानसभेच्या २३ फेर्या होणार असून सर्वाधिक २५ फेर्या बदनापूर विधानसभेच्या होणार आहेत. या मतमोजणीचा कल तिसर्या किंवा चौथ्या फेरीपासूनच लक्षात येईल, असा अंदाज आहे. संपूर्ण मतमोजणीचा अंतिम निकाल निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्याबरोबर दुपारी २ च्या सुमारास जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जालना विधानसभा मतदारसंघात १ लाख ५३ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बदनापूरात १ लाख ८० हजार ४४, भोकरदन १ लाख ८५ हजार ११०, सिल्लोड १ लाख ७९ हजार ६६९, फुलंब्री १ लाख ८९ हजार ५८६ व पैठण विधानसभा मतदारसंघात १ लाख ७७ हजार ९३३ एवढ्या मतदारांनी असे एकूण १० लाख ६५ हजार ४४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान झाले. २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालासाठी उमेदवारांसह मतदारांना २२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. आता निकालाचे काऊंट डाऊन सुरू झाले असून, अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल कुणाला असणार हे शुक्रवारीच समजणार आहे. (प्रतिनिधी) २५ फेर्यांत मतमोजणी होणार या लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय मतमोजणी होणार असून, पहिल्या फेरीपासूनच कोणत्या विधानसभेतून कोणाला मताधिक्य आहे, हे सहजपणे कळणार आहे. मतमोजणीच्या सरासरी २५ फेर्या होतील, असा अंदाज आहे. औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार असून, त्याठिकाणी अधिकारी, कर्मचार्यांसाठी प्रशासनाने चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. या मतदारसंघात ६६.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जालना विधानसभेत ५४.१०, बदनापूर ६६.६०, भोकरदन ७१.४३, सिल्लोड ६७.३८, फुलंब्री ६८.७६ व पैठण विधानसभेत ६९.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.