ढगाळ वातावरणामुळे पैठण तालुक्यातील कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:06+5:302021-01-08T04:09:06+5:30
पैठण : ढगाळ वातावरणामुळे पैठण तालुक्यात पणन महासंघातर्फे केली जाणारी कापूस खरेदी पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात ...

ढगाळ वातावरणामुळे पैठण तालुक्यातील कापूस खरेदी बंद
पैठण : ढगाळ वातावरणामुळे पैठण तालुक्यात पणन महासंघातर्फे केली जाणारी कापूस खरेदी पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील यांनी दिली. सोमवारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पैठण तालुक्यात काही ठिकाणी भुरभुर पावसाने हजेरी लावल्याने तातडीने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सीसीआयची कापूस खरेदी मात्र सोमवारी तालुक्यात सुरू होती.
सोमवारी पैठण तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी भुरभुर पावसाने हजेरी लावली. वातावरणात अपेक्षित बदल होईपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील म्हणाले. तालुक्यात निलजगाव, बालानगर, धनगाव, ढोरकीन येथे फेडरेशन अंतर्गत सहा खरेदी केंद्र सुरू आहेत.
फेडरेशन बालानगर केंद्रांतर्गत ९४१२ शेतकऱ्यांनी कापसाची ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी १८७२ शेतकऱ्यांकडून १०००९३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. पाचोड येथे सीसीआय अंतर्गत ३ जिनिंग व रहाटगाव येथे एका जिनिंगवर खरेदी सुरू आहे. सीसीआय पाचोड केंद्रांतर्गत ३१२८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. यापैकी दिनांक ४ जानेवारीपर्यंत १६१५ शेतकऱ्यांकडून ४८७३२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे.
यापुढे ऑनलाइन १६०० क्रमांकापुढे खरेदी होणार......
ज्या नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ऑनलाईन नंबर १६०० च्या अगोदर आहे. अशा शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस केंद्रावर आणणे अपेक्षित होते; परंतु हे शेतकरी अद्याप आलेले नाहीत, याचा अर्थ या शेतकऱ्यांकडे कापूस नाही असा होतो. त्यामुळे यापुढील काळात शिल्लक कापूस आहे, असे कारण सांगून १६०० नंबरच्या आतील कापूस खरेदी केला जाणार नाही असे बाजार समितीने घोषित केले आहे.
ज्या शेतकऱ्यांची ४० क्विंटलपेक्षा जास्त नोंद आहे अशा शेतकऱ्यांनी एका दिवसात ४० क्विंटल व शिल्लक असलेला कापूस दुसऱ्या दिवशी आणणे अपेक्षित होते; परंतु बरेच शेतकरी तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी येत आहेत. यापुढे जास्तीचा कापूस दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच घेऊन यावे यानंतर कुठल्याही सबबीवर अशा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार नसल्याचे विखे यांनी सांगितले.
फोटो आहे.