नगरसेविका वॉर्डातील घरे पाडायला सांगतात
By Admin | Updated: June 16, 2017 00:59 IST2017-06-16T00:58:13+5:302017-06-16T00:59:22+5:30
औरंगाबाद : जयभवानीनगरच्या नगरसेविका मनपा अधिकाऱ्यांना वॉर्डातील नाल्यावरील घरे पाडायला सांगतात,

नगरसेविका वॉर्डातील घरे पाडायला सांगतात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगरच्या नगरसेविका मनपा अधिकाऱ्यांना वॉर्डातील नाल्यावरील घरे पाडायला सांगतात, असे मनपा अधिकारी वॉर्डातील रहिवाशांना सांगत आहेत. त्यामुळे वॉर्डात आम्ही काय तोंड दाखवावे,असा सवाल भाजप नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला.
जयभवानीनगर वॉर्डात नाल्याच्या काठावर बांधण्यात आलेली घरे पाडल्याशिवाय भूमिगत गटार योजनेतील पाइपलाइन टाकताच येणार नाही, अशी भूमिका भूमिगत गटार योजनेचे काम पाहणारे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी मांडल्यानंतर मुंडे यांनी हा आरोप केला. त्यावर राजू वैद्य यांनी एकाचेही घर न पाडता नाल्याबाहेरून ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम करावे, अशी मागणी केली.
बैठकीत आलेल्या १३ प्रस्तावांपैकी ३ प्रस्ताव व एकाच वेळी तब्बल २२ बैठकांचे इतिवृत्त मंजुरीसाठी आलेले प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी सविस्तर सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे काम जगन्नाथ केंद्रे यांच्या जगप्रयाग या संस्थेला देण्यात आलेले असले तरी त्यांच्याकडे तज्ज्ञ स्टाफ नाही, उपलब्ध कर्मचाऱ्यांचा त्यांनी पीएफ भरलेला नाही, असे आक्षेप सदस्य वैद्य यांनी घेतले. पुढच्या बैठकीत याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.