नगरसेवकांचा बीओटीला विरोध

By Admin | Updated: July 20, 2014 00:28 IST2014-07-20T00:18:00+5:302014-07-20T00:28:31+5:30

नांदेड : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या विकास- कामांना आज सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला़

Corporators opposed BOT | नगरसेवकांचा बीओटीला विरोध

नगरसेवकांचा बीओटीला विरोध

नांदेड : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या विकास- कामांना आज सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला़ महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते़ यावेळी ४० प्रस्तावांना मंजुरी देत सभा शांततेत पार पडली़
महापालिकेच्या शहरातील अनेक मालमत्ता सद्य:स्थितीत गहाण ठेवल्या आहेत़ शहराच्या विकासासाठी बीओटीचा ध्यास घेऊन महापालिकेने यापुढील कामांचे नियोजनही बीओटी तत्त्वावरच करण्याचे ठरविले आहे़ महात्मा फुले बहुद्देशीय सभागृह बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातल्याने सभागृहात या विषयावर चर्चा झाली़ शिवसेनेचे नगरसेवक विनय गुर्रम तसेच विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत यांनी, विशिष्ट कंत्राटदारांचे हित जोपासण्यासाठी बीओटी तत्त्वावर कामे देण्यात येत असल्याचा आरोप केला़ मनपाच्या उत्पन्नाचे साधन असलेली एलबीटी तसेच पारगमन शुल्क वसुली बंद पडण्याच्या मार्गावर आहे़ अशा परिस्थितीत उत्पन्नाचे साधन असलेल्या जागा बीओटी तत्त्वावर देणे महापालिकेला परवडणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली़ सरजितसिंघ गील यांनी शहरात यापुढे बीओटी तत्त्वावर कामे करण्यात येवू नये, अशी मागणी केली़ तर एमआयएमचे गटनेते शेरअली यांनी महापालिकेने यापुढील कामे बीओटी तत्त्वावर दिल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू, असे सांगितले़ या चर्चेनंतर बीओटी विषयावर अभ्यास करण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला़
दरम्यान, मनपाच्या स्वच्छता विभागाने शहर स्वच्छतेच्या कामासंदर्भात दिलेली माहिती उमरेकर यांनी सभागृहात वाचून दाखवली़ तेव्हा प्रशासनाकडून दिलेले उत्तरे कशी फिरवाफिरवीची असतात, याची माहिती त्यांनी दिली़
नगरसेवक शफी कुरेशी यांनी प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला़ ते म्हणाले, प्रत्येक सभेत प्रस्ताव मंजूर केले जातात़ परंतु या प्रस्तावाची अंमलबजावणी होत नाही़ प्रशासनाकडून नगरसेवकांचा अपमान होत असून या प्रकाराचा सभागृहात निषेध करण्यात येत आहे़
विष्णूपुरी प्रकल्पात आता अल्पसाठा असल्याने दिग्रस बंधाऱ्यातून हक्काचे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली़ परभणी येथील लोकांचा दिग्रसचे पाणी सोडण्यास विरोध असल्याने त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांना भेटून पाणी घ्यावे, असा पर्याय सूचविण्यात आला़
यावेळी आयुक्त जी़ श्रीकांत यांनी शहराला दोन नद्या असून या नद्यांचा उपयोग यापुढील काळात करता येईल, असे सांगितले़ अप्पर पैनगंगेला जोडणारा १७ कोटींचा प्रकल्प हाती घेण्याविषयी आयुक्तांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
तुप्पा येथील प्रकल्प बंद
ऐन सणासुदीच्या काळात शहरातील अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या एटूझेडवर कारवाई करण्याची मागणी सेनेचे नगरसेवक अशोक उमरेकर यांनी घेतली़ तुप्पा येथील खतप्रकल्प अर्ध्यावरच सोडून पलायन केलेल्या एटूझेड कंपनीला या कामासाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे़ शहर स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी एटूझेड कंपनीवरच आहे़ त्यामुळे शहर स्वच्छतेच्या कामाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत़
शहरात ४ दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम बंद
शहरातील स्वच्छतेचा विषय प्रामुख्याने मांडणाऱ्या नगरसेवक उमरेकर यांनी, शहरात चार दिवसांपासून एटूझेड कंपनीकडून कचरा उचलण्याचे काम बंद झाल्याचे सांगितले़ त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून अस्वच्छता पसरली आहे़ यास जबाबदार असलेल्या एटूझेडवर कारवाई करून सदर कंत्राटदाराची हकालपट्टी करावी, अशी मागणीही उमरेकर यांनी केली़

Web Title: Corporators opposed BOT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.