वसमतमध्ये नगरसेवकांचे उपोषण
By Admin | Updated: June 21, 2014 00:57 IST2014-06-20T23:51:47+5:302014-06-21T00:57:51+5:30
वसमत : शहरात स्वच्छता करण्यात नगरपालिका प्रशासन स्पेशल अपयश ठरल्याने व चोहीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे.

वसमतमध्ये नगरसेवकांचे उपोषण
वसमत : शहरात स्वच्छता करण्यात नगरपालिका प्रशासन स्पेशल अपयश ठरल्याने व चोहीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे. शहर स्वच्छ करा या मागणीसाठी आज नगरपालिकेसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्यांनी उपोषण करून आक्रमक पवित्रा घेतला या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारी व नागरिकही उपस्थित होते.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून पायी चालणेही अवघड झाले आहे. गटाराचे पाणी दररोज सकाळी १० वाजेपर्यंत रस्त्यावरून वाहते. त्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: दुकानांच्या ओट्यावरून ये-जा करावी लागते. एवढी बिकटअवस्था बाजारपेठेत आहे. शहरात इतरत्रही कचऱ्यांचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक वैतागले आहेत. या प्रकाराकडे सत्ताधारी व नगर प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आघाडीच्या सदस्यांनी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारी, नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारीही उपोषणार्थींची समजूत घालण्यासाठी नगराध्यक्षांचे पती शिवदास बोड्डेवार, शिवसेना गटनेते सुनील काळे, उपमुख्याधिकारी मुजीब खान, नगर अभियंता रत्नाकर अडसीरे व अन्य अधिकारी, कर्मचारी हजर झाले.
दोन तासांच्या प्रदीर्घ आरोप- प्रत्यारोपानंतर नगरपालिकेत लेखी आश्वासन देवून १ तारखेपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने ४ वाजता उपोषण आटोपले. उपोषणात राष्ट्रवादीचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष शशिकुमार कुल्थे, खलील अहेमद, राजकुमार एंगडे, अ. अरशद अ. खादर, अफसर लड्डा, बालाजी कट्टेकर, राहुल उबारे, दत्तात्रय बोबडे, भास्कर गवळी, बालाजी जांभळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.
शहरातील स्वच्छतेचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरल्याने नागरिकांनीही उपोषणाला व मागणीला पाठिंबा दिला. नगरपालिकेच्या कारभारावर व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच शहराच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून शहर गेल्या पंचवीस वर्षांत सर्वाधिक बकाल व अस्वच्छतेचा कहर झाल्याचे आरोप उपोषणार्थींनी केले. (वार्ताहर)