‘आघाडी’ला धक्का; नगरसेवक फारुक पटेल यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:13 IST2017-10-18T00:13:57+5:302017-10-18T00:13:57+5:30
अनाधिकृत बांधकाम व थकित कराचा ठपका ठेवून बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती फारुक पटेल यांचे पद नुकतेच रद्द करण्यात आले आहे.

‘आघाडी’ला धक्का; नगरसेवक फारुक पटेल यांचे सदस्यत्व रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनाधिकृत बांधकाम व थकित कराचा ठपका ठेवून बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती फारुक पटेल यांचे पद नुकतेच रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा आदेश काढला. यामुळे काकू-नाना आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
काकू-नाना आघाडीचे प्रभाग क्र. १४ मधून फारुक पटेल हे नगरपालिकेसाठी निवडून आले होते. त्यानंतर याच प्रभागातील रहिवाशी इम्तियाज तांबोळी यांनी पटेल यांच्या विरोधात जिल्हाधिका-यांकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली होती. यामध्ये पटेल यांनी आपल्या नगरसेवकपदाचा गैरवापर करुन घर क्र. १-२३-२४९६ चे बांधकाम विनापरवाना केले. त्यानंतर त्यांच्याकडे पालिकेचे १ लाख ३७ हजार ५८२ रुपयांचा कर थकला असल्याचे याचिकेत नमूद आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यापुढे मागील अनेक दिवसांपासून हे प्रकरण होते. तारखांवर तारखा सुनावणीसाठी दिल्या जात होत्या. अखेर या तारखांना ‘ब्रेक’ लागला असून, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी याचा निकाल दिला आहे. यामध्ये फारुक पटेल यांच्यावर कर थकबाकी व अवैध बांधकामाचा ठपका ठेवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. राज्य नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (ड) व कलम ४४ (१) व (इ) अन्वये पटेल यांना नगरसेवक म्हणून काम करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तक्रारदार इम्तियाज तांबोळी यांच्यावतीने अॅड. विलास जोशी, अॅड. शाहेद रहेमतुल्ला यांनी काम पाहिले.