नगरसेवक बाबूशेठ बागरेचा राष्ट्रवादीमध्ये
By Admin | Updated: August 22, 2015 23:56 IST2015-08-22T23:49:41+5:302015-08-22T23:56:34+5:30
उन्मेष पाटील , कळंब येथील नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक बाबूशेठ बागरेचा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सत्ताधारी मंडळीतील नाराजीला तोंड फुटले आहे.

नगरसेवक बाबूशेठ बागरेचा राष्ट्रवादीमध्ये
उन्मेष पाटील , कळंब
येथील नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक बाबूशेठ बागरेचा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सत्ताधारी मंडळीतील नाराजीला तोंड फुटले आहे. बागरेचा यांच्यापाठोपाठ उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांनीही पद सोडण्याची तयारी चालविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस (आय) चे नगरसेवक बागरेचा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा जबर झटका मानला जातो आहे. बागरेचा हे बाजार समितीमध्ये मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग व्यापारी मतदारसंघात असल्याने राष्ट्रवादीसाठी हा प्लस पॉर्इंट मानला जातो आहे. दरम्यान, नगर परिषदेमधील सत्ताधारी मंडळीतील नाराजी या प्रकरणाने समोर आली आहे. यापूर्वीच काँगे्रसच्या नगरसेविका छायाताई आष्टेकर यांनी न.प. च्या काभारावर नाराजी व्यक्त केली होती. काही निर्णयाला त्यांनी विरोधही दर्शविला होता. तेंव्हापासूनच सत्ताधारी मंडळीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र समोर आले होते. बागरेचा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या नाराजीवर शिक्कामोर्तब केले आहे. आगामी काळात न.प. मधील आणखी एक नाराज गट राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
न.प. मधील कोणत्याच निर्णयात आपल्याला विश्वासात घेतले नाही. सर्वसाधारण बैठकीमध्ये मी सुचविलेल्या विषयाला दुर्लक्षित करण्यात येत होते. न.प. च्या कारभारातही पारदर्शकता राहिली नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या सोई-सुविधा सत्ताधारी पक्षात असूनही देवू शकलो नाही. या सर्व बाबींमुळे नगरसेवक म्हणून मानसिक कोंडमारा होत असल्यानेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण नगरसेवक बाबूशेठ बागरेचा म्हणाले.
न.प. मध्ये काम करताना सध्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पद असतानाही कामे करता येते नाहीत. यासाठी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत तयारी केली असून, येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेणार आहे. पक्षश्रेष्ठींनी काही शब्द दिले होते तेही पाळले नसल्याने नाराज असल्याचे उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांनी सांगितले.