दिवाळीत एसटी प्रवास महागणार, तिकिट दरात १० ते २० टक्के वाढीचा महामंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 17:53 IST2017-09-17T17:53:38+5:302017-09-17T17:53:48+5:30
एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या कालावधीत यंदाही १० ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

दिवाळीत एसटी प्रवास महागणार, तिकिट दरात १० ते २० टक्के वाढीचा महामंडळाचा निर्णय
औरंगाबाद, दि.17 : एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या कालावधीत यंदाही १० ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
सणासुदीच्या आणि सुट्यांच्या कालावधीत खाजगी बस कंपन्यांकडून सर्रास भाडेवाढ केली जाते. दिवाळी तोंडावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यामुळे खाजगी बस कंपन्यांकडून बसच्या भाड्यात सर्रास वाढ केली जाते. तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी.महामंडळानेही दिवाळीमध्ये २० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान ही वाढ राहणार आहे. १० ते २० टक्के भाडेवाढ होईल,अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.
औरंगाबाद-पुणे मार्गावर धावणा-या शिवनेरी बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या प्रवाशांना सर्वाधिक भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. आजघडीला ६५६ रुपये भाडे असलेल्या या बससेवेसाठी प्रवाशांना दिवाळीत जवळपास १३० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद -पुणे प्रवासासाठी साधी बससेवेचे(लाल) सध्या २४२ तर एशियाड बससेवेचे ३४१ तिकिट दर आहे. १४ आॅक्टोबरपासून त्यामुळे अनुक्रमे १० आणि १५ टक्के वाढ होईल. याचप्रकारे इतर मार्गावरील बससेच्या तिकिट दरात वाढ होईल,अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
एस.टी.ची भाडेवाढ
साधी बस (लाल), रात्र बससेवा १० टक्के
एशियाड बससेवा १५ टक्के
शिवनेरी बससेवा २० टक्के