औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने शहरातील प्रसिद्ध खांब नदीपात्राला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एका मोठ्या खासगी कंपनीची मदत घेण्यात येणार असून, लवकरच कंपनीसोबत यासंदर्भात करार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
५ वर्षांपूर्वी महापालिकेने खाम नदीतील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते पुढे सोडण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. छावणी भागातील लोखंडी पुलाजवळ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने हे काम केले होते. खासगी कंपनीला महापालिकेकडून ज्या पद्धतीने सहकार्य मिळायला हवे होते ते न मिळाल्यामुळे प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळावा लागला होता. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पुन्हा एकदा खाम नदीपत्राचे पुनरूजीवन करण्याचा विडा उचलला आहे. ५ वर्षांपूर्वी ज्या कंपनीसोबत काम सुरू केले होते त्याच कंपनीला सोबत घेऊन भविष्यात काम करण्यात येणार आहे. नदी कोरडी झाली तरी ती कधीच मरत नाही. त्यामुळे हर्सूल तलावापासून थेट वाळूजपर्यंत नदीपात्रावर काम करण्यात येणार आहे. काही ठिकाणी खोलीकरण, वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नदीपात्रात येणारी घाण पाणी स्वच्छ करून ते पुढे सोडण्यात येईल. यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार असल्याचे पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून ठिकठिकाणी लोखंडी जाळीसुद्धा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.