कोरोना रुग्णांच्या जेवणासाठी मनपाचा खर्च साडेचार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST2021-04-30T04:02:57+5:302021-04-30T04:02:57+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे शहरातील १४ कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. मागील वर्षभरात या जेवणावर ४ ...

कोरोना रुग्णांच्या जेवणासाठी मनपाचा खर्च साडेचार कोटी
औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे शहरातील १४ कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. मागील वर्षभरात या जेवणावर ४ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली तसतसे महानगरपालिकेला कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी लागली. सरकारी दवाखान्यात कोरोना रुग्णांना मोफत सेवा पुरविल्या जात आहेत. मनपाचे डॉक्टर, नर्स अन्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांना कोरोनामुक्त करत आहे.
यामुळे कोरोनाबाधित आलेला रुग्ण व त्याचे नातेवाईक सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. गरीब, मध्यमवर्गीय रुग्णासाठी तर घाटी रुग्णालय, मनपाचे कोविड केअर सेंटर वरदान ठरत आहेत.
येथील दर्जेदार वैद्यकीय सेवांमुळे आता घाटी व मनपाच्या आरोग्य केंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. कोरोना रुग्णाला वेळेवर उपचार, औषधी, जेवण मिळणे महत्त्वाचे असते. महानगरपालिकेने जेवणासाठी मागील वर्षी १० केटरर्स नेमले होते. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंत रुग्ण जेवणाचे ४ कोटी ५५ लाख रुपयांचे बिल या १० कंत्राटदारांनी मनपाला दिले. मनपाने ४ कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम अदा केली. सध्या यातील ६ कंत्राटदार १४ कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना नाश्ता, जेवण देत आहे. जेवणही चांगले मिळत असल्याचे रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत.
चौकट
रुग्ण व नातेवाइकांनी मानसिक त्रास दिल्याने सोडले काम
एक नामांकित केटरर्सने सांगितले की, मनपाने कोविड सेंटरला जेवण पुरविण्याची जबाबदारी आमच्यावर दिली होती. आम्ही दर्जेदार जेवण पुरवत होतो. पण काही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी जेवणाविषयी हेतुपुरस्सर तक्रारी केल्या. त्यात त्यांचा हेतू चांगला नव्हता. मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा आम्ही आमचे नाव खराब होऊ नये म्हणून, या कंत्राटातून बाहेर पडलो. मनपातर्फे बिलाची सर्व रक्कम वेळेवर मिळत होती.