CoronaVirus : रडला म्हणून भाकर दिली.. नंतर नजर चुकवून ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 10:28 IST2020-04-18T10:17:54+5:302020-04-18T10:28:06+5:30
१२ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता मातोरी चेक पोस्टवरील चित्र

CoronaVirus : रडला म्हणून भाकर दिली.. नंतर नजर चुकवून ठोकली धूम
- सोमनाथ खताळ
बीड : दोघे जण दुचाकीवरून मातोरी चेकपोस्टवर आले. बंदोबस्तावरील पोलिसांनी अडविले. इतर पथकाने त्यांची रितसर नोंदणी केली. परंतु उपाशी असल्याने ते ढसाढसा रडत होते. बाजुच्याच हॉटेलमध्ये बसवून त्यांना जवळच्या भाकरी आणि टरबुज दिले. त्यांनी जेवण केले. दुसरी वाहने तपासत असतानाच या दोघांनी पोलिसांची नजर चुकवून धुम ठोकली. हा प्रकार १२ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता मातोरी चेकपोस्टवर घडला. यातीलच दोघांपैकी एक असलेला व्यक्ती परभणी येथे कोरोनाग्रस्त म्हणून रुग्णालयात दाखल झाला आहे.
२१ वर्षीय तरूण पुण्याहून आपल्या मित्रासोबत हिंगोलीकडे जात होता. परंतु गावात आपल्याला येऊ देणार नाहीत, म्हणून त्याने परभणी येथे बहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला. संचारंबदी असल्याने ते रात्रीच्यावेळी प्रवास करीत होते. १२ एप्रिल रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास मातोरी चेकपोस्टवर आले. येथे त्यांना पोलिसांच्या पथकाने अडविले. विचारपूस केली. त्यांची रजिस्टरला नोंद घेतली. कसलेच अत्यावश्यक कारण नसल्याने त्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यातील एक तरूण खाली उतरला आणि पोलिसांकडे विणवणी करू लागला. दुसऱ्याने दुचाकी बॅरिकेट्सच्या पुढे आणून लावली. दोघांपैकी एक उतरलेला असल्याने पोलिसही गाफिल राहिले. १० ते १५ मिनीट ते पोलिसांकडे विनवणी करीत होते. तरीही त्यांना प्रवेश दिला नाही.
दरम्यान, पुण्याहून आलेले असल्याने सर्व हॉटेल, धाबे बंद असल्याने ते भुकेने व्याकूळ झालेले होते. उपाशी आहोत. काही तरी खायला प्यायला द्या अशी विनवणी करीत ते ढसाढसा रडत होते. उपस्थित पथकातील लोकांनी त्यांना बाजुच्या हॉटेलमध्ये बसविले. जवळचे जेवण व टरबुज खायला दिले. याचवेळी पथकाने त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि इतर वाहने तपासणीस निघून गेले. अंधार असल्याने दुरपर्यंत काहीच दिसत नव्हते. हीच संधी साधून त्या दोघांनी दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांना समजण्याच्या आतच त्यांनी तिंतरवणीजवळ केली होती. पुढे त्यांनी ढालेगाव चेकपोस्टवरील पथकाचीही दिशाभूल करीत पाथरी गाठले. नंतर सकाळी परभणीत पोहचले. रात्रभर ते दुचाकीवरून प्रवास करीत त्यांनी परभणी गाठले. दुसºया दिवशी घशाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात तो दाखल झाला. स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला.
१२ लोक आयसोलेशनमध्ये
याच कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या १२ लोकांना शुक्रवारी पहाटे जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दोन खाजगी व्यक्ती असून बाकी सर्व पोलीस, शिक्षण, कृषी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. एका पोलीस उपनिरीक्षकाचाही यात समावेश आहे.
जिल्हा आरोग्य अधिका-यांची भेट
मातोरी चेकपोस्टवरून हा कोरोनाग्रस्त गेल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी मातोरी चेकपोस्ट गाठली. येथील सर्व आढावा घेण्याबरोबरच सर्वांना काळजी घेण्यासह तत्पर राहण्याच्या सूचना केल्या. मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रातही त्यांनी धावती भेट देत औषधी, बाह्य रुग्ण, निवास बांधकाम आदींची माहिती घेतली.
अन् पथकातील लोकांना बसला धक्का
त्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आणि त्याने बीड जिल्ह्यातून प्रवेश केल्याचे समजताच बीडची यंत्रणा जागी झाली. सर्व चेकपोस्टवरून माहिती घेतली. मातोरीला नोंद असल्याचे समजताच त्या दिवशी रात्री बंदोबस्तावर असणाºयांची नावे मागविली. ते गाढ झोपेत असतानाच त्यांना गुरूवारी मध्यरात्री कॉल गेले आणि माहिती दिली. त्यांना हे ऐकूण धक्काच बसला. परंतु, सर्वच सुशिक्षित असल्याने त्यांनी कसलाही आढावेढा न घेता सुचनांचे पालन करीत पहाटेच जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.
परभणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची माहिती मिळताच त्याच्या संपर्कात आलेल्या मातोरी चेकपोस्टवरील १२ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. एखादा संशयित रुग्णालयात दाखल होताच ‘बी प्लॅन’ तयार केला जातो. संपर्कातील लोकांची नावे आणि संपर्क क्रमांक मागवून आढावा घेतला जात आहे. रिपोर्ट निगेटिव्ह येताच हा प्लॅन स्टॉप केला जातो.
- डॉ.आर.बी.पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड