कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST2021-05-05T04:04:46+5:302021-05-05T04:04:46+5:30
कोरोनाने लग्नसोहळ्याचे मंगल सूरसुद्धा बेसूर झाले आहेत. विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या वधू-वरांच्या स्वप्नांना तूर्तास ...

कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर फिरले पाणी
कोरोनाने लग्नसोहळ्याचे मंगल सूरसुद्धा बेसूर झाले आहेत. विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या वधू-वरांच्या स्वप्नांना तूर्तास ब्रेक लागल्याचे दिसत आहे. राज्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. मात्र या महिन्यात विवाह मुहूर्त नव्हते. त्यानंतर विवाह सोहळ्यांवर बंदी आली. लॉन्स, मंगल कार्यालये बंद करण्यात आली. सध्या मे व जून या दोन महिन्यांत तब्बल २३ विवाह मुहूर्त आहेत. नियोजित विवाहसोहळे रद्द करण्यात आल्याने यावर अवलंबून असणारे लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, केटरर्स, डेकोरेशन, पत्रिकावाले, फर्निचर दुकानदार, सराफा, कापड दुकानदार, मंडपवाले, छायाचित्रकार या व्यावसायिकांना फटका बसला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत कमी लोकांत विवाह सोहळा पार पाडण्याची प्रथा निर्माण झाली आहे. केवळ पन्नास लोकांना निमंत्रण देण्याची तरतूद असल्याने लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका वाटणेही बंद झाले आहे. लग्नपत्रिका वाटनेच बंद झाल्याने छपाई व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना गतवर्षी व या वर्षीही मोठा फटका बसला आहे.
चौकट
मे, जून महिन्यातील विवाहमुहूर्त
मे महिन्यात सर्वाधिक १५ विवाहमुहूर्त आहेत. मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, ३६, २८, ३०, ३१ तर जूनमध्ये ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८ तर जुलैमध्ये १, २, ३, १३ असे विवाहमुहूर्त आहेत. अनेक कुटुंबांनी या तारखा निश्चित केल्या होत्या. मात्र कोरोनाच्या संकटामुळे नियोजित लग्नाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नवीन तारखा धरून लग्नसोहळ्याला गती येणार आहे.