रात्रंदिवस रुग्णसेवा देणारे कोरोना योद्धेच वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:05 IST2021-04-30T04:05:27+5:302021-04-30T04:05:27+5:30

अनेकांचे बँकांचे हप्ते हुकले औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना योद्धे डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांसाठी कार्यरत आहेत. ...

Corona is a warrior who provides day and night care without pay | रात्रंदिवस रुग्णसेवा देणारे कोरोना योद्धेच वेतनाविना

रात्रंदिवस रुग्णसेवा देणारे कोरोना योद्धेच वेतनाविना

अनेकांचे बँकांचे हप्ते हुकले

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना योद्धे डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांसाठी कार्यरत आहेत. पण या कोरोना योध्द्‌यांनाच सध्या आर्थिक अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. एप्रिल महिना संपत आला, तरी अद्यापही त्यांचे मार्चचे वेतन झालेले नाही. ही परिस्थिती फक्त औरंगाबाद जिल्ह्याची नाही, तर संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य विभागातील कोरोना योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन अजूनही झालेले नाही. वेतनासाठी कर्मचारी, संघटना वारंवार पाठपुरावा करीत आहेत. परंतु लवकरच वेतन होईल, बजेट येईल, असे सांगण्यापलीकडे काहीही उत्तर मिळत नसल्याची स्थिती आहे.

जिल्हा रुग्णालय हे नवीनच आहे. येथील पदांना कन्ट्युनेशन मिळणे, बजेटला मान्यता मिळणे बाकी असल्याने वेतन थांबल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारीत आयकर कपातीमुळे वेतन कमी मिळाले, तर मार्चचे वेतन मिळालेच नाही. एप्रिल महिनाही संपत आला आहे. शासकीय डाॅक्टर असल्याने एक्‌-दोन महिन्यांचे वेतन झाले नाही तर काही फरक पडत नाही, असा अनेकांचा समज असेल. पण गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बँकेचा हप्ताही हुकला, असे काही डाॅक्टरांनी सांगितले.

आर्थिक अडचण

वरिष्ठांसोबत आमचे वेतनासंदर्भात बोलणे झाले आहे. आगामी दोन ते तीन दिवसात वेतन होईल, असे सांगण्यात आले आहे. बजेट कन्ट्युनेशन झाले नसल्याने वेतन झालेले नाही. फेब्रुवारीत आयकर कपात होऊन वेतन दिलेले आहे. त्यात आता मार्चचे वेतन नाही, एप्रिलही संपत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती संपूर्ण मराठवाड्यात आहे.

- डाॅ. संदिपान काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना

राज्यस्तरावरील बाब

आर्थिक वर्षातील पहिला महिना आहे. वेतन ही राज्यस्तरावरील बाब आहे. पण आगामी काही दिवसांत वेतन होऊन जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.

Web Title: Corona is a warrior who provides day and night care without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.