corona virus : सौदीतून परतलेल्या युवकाची ग्रामस्थांना धास्ती; प्राथमिक तपासणीनंतर दिला घरी राहण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:48 IST2020-03-16T14:40:23+5:302020-03-16T16:48:12+5:30
हा युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता.

corona virus : सौदीतून परतलेल्या युवकाची ग्रामस्थांना धास्ती; प्राथमिक तपासणीनंतर दिला घरी राहण्याचा सल्ला
देगलूर (जि़ नांदेड) : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सौदी अरेबियातून तालुक्यातील तडखेल येथे आपल्या गावी आलेल्या एका २२ वर्षीय युवकाची गावकऱ्यांनी धास्ती घेतली. या युवकास देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून केलेल्या प्राथमिक तपासणीनंतर तो परत गावी गेला.
हा युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता. कोरोनाच्या भीतीमुळे तो ३ मार्च रोजी हैदराबादमार्गे तडखेल येथे आला. या युवकास अनेक वेळा खोकलताना काही ग्रामस्थांनी पाहिले. तीन दिवस त्यास खोकला होता. मात्र तीन दिवसानंतर त्याचा खोकला कमी झाला.
असेच दहा दिवस उलटून गेले. मात्र एकाने ही बाब शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे, वैद्यकीय अधीक्षक संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्या युवकास रुग्णवाहिकेतून आणण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला.
परंतु डॉक्टरांचे पथक गावात गेले तर घबराट पसरेल, असा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाल्यामुळे त्यांनी त्या युवकाशी फोनवर संपर्क साधून आॅटोत देगलूर येथे येण्याच्या सूचना दिल्या. देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तो युवक आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी केली.
यावेळी त्या युवकास ताप, खोकला अशी कोणतीच प्राथमिक लक्षणे डॉक्टरांना आढळून आली नाहीत. त्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी सांगितले. मात्र तरीही खबरदारी म्हणून दोन दिवस रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र आपल्याला काहीच त्रास नाही, असे सांगत तो युवक गावी परत गेला.
नागरिकांनी घाबरू नये -वैद्यकीय अधीक्षक
हा युवक सौदी अरेबियातून येऊन बारा दिवस उलटले. कोरोनाची लक्षणे आठ दिवसांतच कळून येतात. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो बाहेरच्या देशातून आल्यामुळे आणखी दोन दिवस आरोग्य विभागाचे कर्मचारी तडखेल येथे जाऊन त्याची तपासणी करतील. फक्त खबरदारी म्हणून त्यास स्वतंत्र खोलीत ठेवण्याच्या सूचना त्याच्या कुटुंबियास दिली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच आपल्या गावी कोणी बाहेरच्या देशातून आल्यास आम्हाला सूचना द्याव्यात, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संभाजी पाटील यांनी केले आहे.