corona virus : धक्कादायक ! घाटी रुग्णालयास मिळाले १५० व्हेंटिलेटर, पण ५० पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:57 PM2021-05-12T17:57:38+5:302021-05-12T17:59:58+5:30

corona virus : आयसीयूत उपयोग शून्य, राजकीय दबावातून व्हेंटिलेटरच्या दर्जाकडे कानाडोळा

corona virus : Shocking! Valley Hospital received 150 ventilators, but 50 fell | corona virus : धक्कादायक ! घाटी रुग्णालयास मिळाले १५० व्हेंटिलेटर, पण ५० पडून

corona virus : धक्कादायक ! घाटी रुग्णालयास मिळाले १५० व्हेंटिलेटर, पण ५० पडून

googlenewsNext
ठळक मुद्दे८३ टाकले वाटून, १७ नावालाच घाटीतपीएम केअर फंडातून प्राप्त व्हेंटिलेटरची चित्तरकथा

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटी रुग्णालयास देण्यात आलेले १५० व्हेंटिलेटर्स आयसीयू कक्षात लावण्याच्या दर्जाचे नाहीत. त्यामुळे घाटी रुग्णालयाने हे इतर जिल्ह्यास आणि खासगी रुग्णालयास वाटप करून टाकले. उर्वरित ५० व्हेंटिलेटर्स तसेच पडून असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर्स दुय्यम दर्जाचे असल्याचा आरोप जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी झालेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत केला होता.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड घाटी रुग्णालयाला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १०० व्हेंटिलेटरची गरज होती. पीएम केअर फंडातून महिनाभरापूर्वी १०० आणि १५ दिवसांपूर्वीच ५० व्हेंटिलेटर मिळाले. पण या व्हेंटिलेटरला ऑक्सिजन सेंसरच नव्हते. शिवाय हे व्हेंटिलेटर आयसीयूत वापरण्यायोग्यही नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु दर्जाकडे दुर्लक्ष करून व्हेंटिलेटर घेण्यात आले. त्यातील ८३ व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना, इतर जिल्ह्यांना वाटून प्रशासन मोकळे झाले. घाटीत १७ व्हेंटिलेटर नावालाच ठेवण्यात आले, तर ५० व्हेंटिलेटरची खोकीही उघडलेली नाहीत. दुसरीकडे व्हेंटिलेटरअभावी रुग्णांचा श्वास गुदमरण्याची वेळ ओढावत आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घाटीला १२ एप्रिल रोजी पीएम केअर फंडातून १०० व्हेंटिलेटर मिळाले. व्हेंटिलेटर घेऊन आलेल्या ट्रकमध्ये व्हेंटिलेटरचे इतर साहित्य नसल्याचे लक्षात आले. तेव्हा जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर व्हेंटिलेटर ठेवून घेण्यात आले. त्यानंतर आणखी ५० व्हेंटिलेटर आले. पण हे व्हेंटिलेटर जसे आले आहे, तसेच पडून आहेत.

४१४ पैकी एक व्हेंटिलेटर रिकामे
जिल्ह्यात आजघडीला ४१४ पैकी एक व्हेंटिलेटर मंगळवारी रिकामे होते. त्यामुळे व्हेंटिलेटरची किती गरज आहे, हे स्पष्ट होते.

काय आहेत व्हेंटिलेटरमधील त्रुटी
-पीएम केअर फंडातून महिनाभरापूर्वी प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटरला कनेक्टर, ऑक्सिजन सेन्सरच नव्हते. गंभीर रुग्णांना ज्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते, त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यासाठी हे सेन्सर महत्त्वपूर्ण ठरतात. शिवाय व्हेंटिलेटर आयसीयूत वापरता येणारे व्हेंटिलेटर नाही. ऑक्सिजनवरून व्हेंटिलेटवर जाण्यापूर्वीच्या अवस्थेतील रुग्णांसाठी केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर वापरता येणार आहे. निम्नस्तरीय व्हेंटिलेटर आहेत.

‘मेक इन गुजरात व्हेंटिलेटर’
पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर ‘दमन-३००’चे आहे. गुजरात येथून पुरवठा झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. योग्य दर्जा नसताना केवळ मोफत मिळाले म्हणून आणि राजकीय दबावातून व्हेंटिलेटर ठेवून घेण्यात आल्याचे समजते.

व्हेंटिलेटर दुरुस्तीचा दावा
घाटीला गतवर्षीही ४४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. यातील जवळपास २० व्हेंटिलेटर नादुरुस्त पडले होते. त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, ही सर्व चांगल्या दर्जाची व्हेंटिलेटर असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर आरोग्य उपसंचालक कार्यालयास गतवर्षी ६० व्हेंटिलेटर मिळाले होते.

व्हेंटिलेटरच्या अवस्थेला कोण आहेत जबाबदार ?
१) कोरोनाच्या परिस्थितीवर, रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. १२ एप्रिल रोजी १०० व्हेंटिलेटर पोहोचल्यानंतर त्याची अवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. तरीही व्हेंटिलेटर घेण्यात आले.
२) घाटी रुग्णालयाला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. कारण याठिकाणी गंभीर रुग्ण दाखल असतात. आयसीयू व्हेंटिलेटर गरजेचे असतानाचा आयसीयूत वापरण्यास योग्य नसलेले व्हेंटिलेटर का घेण्यात आले.

टेक्निकल कमिटीकडून पडताळणी
यावर्षी पीएम केअर फंडातून १०० व्हेंटिलेटर आले. त्यापैकी विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार ७५ व्हेंटिलेटर अन्य जिल्ह्यांना, तर ८ व्हेंटिलेटर शहरातील खाजगी रुग्णालयांना दिले आहेत. आमच्याकडे १७ व्हेंटिलेटर आहेत. त्यानंतर १५ दिवसांपूर्वीच आणखी ५० व्हेंटिलेटर मिळाले. पण उघडण्यात आलेले नाही. कारण व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपनीचे इंजिनिअर आलेले नाही. त्याची वाट पहात आहोत. प्राप्त व्हेंटिलेटरची टेक्निकल कमिटीकडून पडताळणी करण्यात येणार आहे.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

आमच्या अंतर्गत नाही
गतवर्षी केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर मिळाले. हे व्हेंटिलेटर हिंगोली, परभणी, जिल्हा रुग्णालयाला देण्यात आले आहे. घाटी रुग्णालयाला पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर आले. परंतु ते आमच्या अंतर्गत नाही.
-डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

अजून वापर नाही
घाटी रुग्णालयाकडून ५ व्हेंटिलेटर मिळाले. यातील ३ व्हेंटिलेटर चालू नव्हते. ते परत करून अन्य ३ व्हेंटिलेटर घेण्यात आले. व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजन सेंन्सर लागते. काही व्हेंटिलेटरला ते नव्हते. हे व्हेंटिलेटर सध्या निरीक्षणाखाली (अंडर ऑब्जर्वेशन) आहेत. रुग्णांना वापरण्यास अजून सुरुवात केलेली नाही.
-डाॅ. अजय रोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

Web Title: corona virus : Shocking! Valley Hospital received 150 ventilators, but 50 fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.