कोरोना: जानेवारी, फेब्रुवारी महिने अधिक धोकादायक
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:55+5:302020-11-28T04:11:55+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याच्या दृष्टीने औरंगाबादसाठी आगामी तीन महिने धोक्याचे आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी ...

कोरोना: जानेवारी, फेब्रुवारी महिने अधिक धोकादायक
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याच्या दृष्टीने औरंगाबादसाठी आगामी तीन महिने धोक्याचे आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने अधिक जोखमीचे असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी नियमांचे शंभर टक्के पालन केल्यास या संकटातूनही आपण निश्चित मार्ग काढू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या शहरात दररोजची कोरोना रुग्णांची संख्या १२५ च्या आसपास आहे, त्यामुळे तेवढी चिंता नाही. पण येत्या काळात थंडी वाढत जाईल तसतशी चिंता वाढणार आहे. नागरिकांनी विनामास्क फिरण्याचे बंद करावे. मास्क वापरण्यासह सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर महत्वाचा आहे. या बाबीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. डिसेंबर महिन्यात तुलनेने थंडी कमी असते, पण जानेवारी –फेब्रुवारी महिन्यात थंडी वाढते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या तुलनेत हे दोन महिने कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेच्या दृष्टीने चिंता वाढवणारे ठरु शकतात. कोरोनाबाधितांवर उपचार करण्याच्या दृष्टीने पालिकेची तयारी पूर्णपणे आहे, असे पाडळकर यांनी नमूद केले. कोरोनाच्या चाचण्या देखील वाढवल्या जात आहेत.
चौकट...
एक महिन्यात ऑक्सिजन प्लांट
मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये येत्या एक महिन्यात ऑक्सिजन प्लांट सुरु होईल. अन्य कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवरील उपचारासाठीच्या आवश्यक त्या सुविधा आहेत, त्यात गरजेनुसार सुधारणा करण्याची देखील पालिकेची तयारी आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा सुरुवातीपासूनच कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात होती. पुढेही प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेचे काम सुरुच राहील. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.