कोरोना संकट जात नाही तोच साथीच्या आजारांनी काढले डोके वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:04 IST2021-08-12T04:04:57+5:302021-08-12T04:04:57+5:30
आळंद : परिसरात सर्दी, ताप, खोकला व डेंग्यूसदृश हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत साथीच्या आजारांनी घेरा ...

कोरोना संकट जात नाही तोच साथीच्या आजारांनी काढले डोके वर
आळंद : परिसरात सर्दी, ताप, खोकला व डेंग्यूसदृश हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत साथीच्या आजारांनी घेरा घातल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
फुलंब्री तालुक्यातील आळंद, ऊमरावती, जातवा, नायगव्हाण, पिंपरी, सताळ या गावांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण कोरोनाबाधित झाले होते. कालांतराने योग्य उपचाराच्या जोरावर नागरिकांनी कोरोनावर मात केली. मात्र, दुसऱ्या लाटेत या परिसरात मोठी भीती निर्माण झाली होती. हळूहळू भीती कमी झाल्याने सर्व व्यवहार व नागरिकांचे जीवनमान सुरळीत झाले. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला, हिवताप व डेंग्यूसदृश आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात झालेला बदल होय. लहान मुलांसह वयोवृद्धांत ही लक्षणे आढळून येत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील ओपीडी संख्यादेखील वाढली आहे.
------
गावात धूरफवारणी करण्याची गरज
आळंद गावात जागोजागी गाजरगवताचे साम्राज्य वाढले आहे. सांडपाण्याचे डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने धूरफवारणी केली जावी. तसेच सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जावी, अशी मागणी करण्यात आली.
100821\20210810_133634.jpg
फोटो ओळ:आळंद(ता.फुलंब्री)येथे मुख्य रस्त्याच्या बाजुला साचलेले सांडपाण्याचे डबके व वाढलेले गाजरगवत.