पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींवरही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST2021-05-05T04:04:31+5:302021-05-05T04:04:31+5:30
घाटनांद्रा : मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शासनस्तरावर अनेक निर्बंध घातले गेले. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम ...

पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींवरही कोरोनाचे सावट
घाटनांद्रा : मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शासनस्तरावर अनेक निर्बंध घातले गेले. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होत गेला. त्यात पौरोहित्य करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजबांधवांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे, देवालये बंद असल्याने नित्यनेमाने होणारे धार्मिक कार्यक्रम, घरोघरी होणारे पूजापाठ आदी कार्यक्रम बंद पडले आहेत. तब्बल तेरा महिन्यांपासून देवालये बंद असल्याने पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
कोणताही कार्यक्रम म्हटला की, ब्राह्मणाशिवाय कार्यक्रम पार पडत नसतात. परंतु यंदाही कोरोनाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वच कार्यक्रमांना खीळ बसली आहे. त्यामुळे पौरोहित्य करणाऱ्या समाजबांधवांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. घाटनांद्रा गावात पौरोहित्य करून आपला उदरनिर्वाह चालविणारी पाच ते सहा कुटुंबे आहेत. वर्षभर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, तेरा महिन्यांपासून निर्बंधामुळे या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा?
उन्हाळा सुरू झाला की सर्वत्र लगीनघाईची धामधूम सुरू होते; परंतु यंदाच्या उन्हाळ्यात मुहूर्त असूनही विवाह सोहळे साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. गर्दी न करण्याचे आदेश असल्याने विवाह सोहळ्यांनाही ब्रेक लागल्याने पौरोहित्य करणाऱ्या समाजबांधवांसमोर कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संकट जाऊ दे; देवाकडे साकडे
दरवर्षी प्रत्येकाच्या घरी काहीना काही धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येत असतात. मात्र गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या कहरामुळे प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. लग्न सोहळेदेखील बंद झाले आहेत. जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट लवकर जावो, यासाठी देवाला साकडे घातले आहे.
- रेवणनाथ जोशी, पुरोहित, घाटनांद्रा
030521\fb_img_1619666295891_1.jpg
संग्रहित छयाचित्र