मका उत्पादक पुन्हा अडचणीत
By Admin | Updated: November 19, 2014 01:00 IST2014-11-19T00:39:36+5:302014-11-19T01:00:54+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले.

मका उत्पादक पुन्हा अडचणीत
सुनील कच्छवे , औरंगाबाद
खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न १६ क्विंटलवरून ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही निघालेला नाही.
अत्यल्प पावसामुळे यंदा औरंगाबाद जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. आॅगस्टनंतर जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात कापूस आणि मका ही खरिपाची प्रमुख पिके आहेत. यापैकी ४ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, तर १ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली होती. जून महिना कोरडा गेल्यामुळे दोन्ही पिकांची पेरणी महिनाभर उशिराने झाली होती. शिवाय आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. मक्याची वाढ होण्याच्या काळात पाऊस नसल्याने या पिकाला जबरदस्त फटका बसला. हजारो हेक्टरवरील मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेले. जेथे थोडीफार वाढ झाली तेथेही मक्याची कणसे पुरेशी भरली नाहीत. त्यामुळे मका उत्पन्न ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. जिल्ह्यातील मका उत्पादनाची सरासरी एकरी १६ क्विंटल आहे. मात्र, यंदा हे उत्पन्न ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
खर्च सहा हजार, उत्पन्न २,६०० रुपये
औरंगाबाद तालुक्यातील फेरण जळगाव येथील शेतकरी अशोक हिवराळे यांनी दीड एकरात मका पिकाची लागवड केली होती. त्यासाठी बियाणासह खत, खुरपणी आदींसाठी एकूण सहा हजार रुपये खर्च केला होता. त्यांना या दीड एकरात अवघे तीन क्विंटल एवढेच उत्पन्न निघाले. त्यातून त्यांना केवळ २,६६५ रुपये मिळाले. झालेला खर्चही निघालेला नाही.
फेबु्रवारीनंतर चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार
मका पिकाला फटका बसल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानच झालेले नाही, तर जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा म्हणून मका पिकाकडे बघितले जाते; परंतु यंदा हजारो हेक्टरवरील मका पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फेबु्रवारीनंतर चाराटंचाई भासेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.१
मका उत्पादनासाठी औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, औरंगाबादसह जिल्ह्यातील सर्व नऊही तालुक्यांत मक्याचे उत्पन्न घेतले जाते.
२दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६० लाख क्विंटल मका उत्पादित केला जातो. यंदा उत्पन्न जवळपास ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे चारशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.