कॉपीमुक्तीसाठी उदासीनता
By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:28:41+5:302014-07-23T00:41:53+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३८२ महाविद्यालयांपैकी अवघ्या १२ महाविद्यालयांनी यंदा आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी परीक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.

कॉपीमुक्तीसाठी उदासीनता
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३८२ महाविद्यालयांपैकी अवघ्या १२ महाविद्यालयांनी यंदा आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी परीक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी उर्वरित ३७० महाविद्यालये उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
संलग्नित महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, यासाठी २००६-०७ पासून आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कार योजना सुरू केली. २३ आॅगस्ट हा विद्यापीठाचा स्थापना दिवस असून, त्या दिवशी आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी निवड झालेल्या महाविद्यालयांना रोख १० हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविले जाते.
या पुरस्कारामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी होण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा विभागामार्फत प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार आतापर्यंत १२ महाविद्यालयांचे प्रस्ताव परीक्षा विभागाला प्राप्त झालेले आहेत.
या पुरस्कारासाठी विद्यापीठाने काही निकष ठरविलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी स्वत:च्या इमारतीमध्ये महाविद्यालय असावे, महाविद्यालयांमध्ये ६०० चौ. फूट या मानकाप्रमाणे वर्ग खोल्या असाव्यात, इमारतीमध्ये विद्युत खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा असावी, विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, २०१३-१४ मध्ये झालेल्या परीक्षा कॉपीमुक्त असाव्यात, परीक्षा पारदर्शीपणे घेतल्या जाव्यात, या निकषांची अधिकार मंडळाने पडताळणी केल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांची पुरस्कारासाठी निवड केली जाते.
दरम्यान, बहुतांश संलग्नित महाविद्यालयांमध्ये सोयी-सुविधांचा मोठा अभाव आहे. अनेक महाविद्यालयांना टिकून राहण्यासाठी ते कॉपीमुक्त परीक्षेच्या धोरणाला अप्रत्यक्षपणे विरोधच करतात. त्यामुळे त्यांना विद्यापीठाची संलग्नताही बिनबोभाट दिली जाते. त्यामुळे अशी महाविद्यालये या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत, असे विद्यापीठातील अधिकारी खाजगीत बोलतात.
चारच महाविद्यालयांना पुरस्कार
२०१२-१३ या शैक्षणिक वर्षात फक्त चारच महाविद्यालयांना आदर्श परीक्षा केंद्र पुरस्काराने २३ आॅगस्ट रोजी गौरविण्यात आले.
यामध्ये औरंगाबादेतील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालय, बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय व उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश होता.