मुक्त विद्यापीठाच्या कॉपी‘युक्त’ परीक्षा
By Admin | Updated: May 21, 2015 00:30 IST2015-05-21T00:11:21+5:302015-05-21T00:30:57+5:30
सोमनाथ खताळ , बीड सध्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपी मुक्त घेण्याऐवजी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या नेमलेल्या प्रतिनिधीकडून

मुक्त विद्यापीठाच्या कॉपी‘युक्त’ परीक्षा
सोमनाथ खताळ , बीड
सध्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपी मुक्त घेण्याऐवजी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या नेमलेल्या प्रतिनिधीकडून (बाह्य पर्यवेक्षक) ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने या परीक्षा कॉपी ‘युक्त’ होत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टींगमधून समोर आले.
८ मे पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या हातात पुस्तकांचे गठ्ठे दिसून येत असून वर्गात गेल्यानंतर हे गठ्ठे काढून घेण्यास पर्यवेक्षक आखडता हात घेत आहेत, तर केंद्रप्रमुख व परीक्षा केंद्रावर नेमलेल्या विद्यापीठाच्या प्रतिनिधींकडून या कॉप्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. बुधवारी मराठी, हिंदी, आणि इंग्रजीचा पेपर होता. सकाळी १०:३० ते ०१:३० असा परीक्षेचा वेळ होता. या कॉप्यांचा पर्दाफाश बुधवारी ‘लोकमत’ने स्टींगमधून केला.
असे झाले स्टींग?
बुधवारी शहरातील एका नामांकिम महाविद्यालयात दुपारी १२:३० च्या दरम्यान ‘लोकमत’चमु दाखल झाला. मुख्य प्रवेशद्वाराला कोणीच हटकले नाही. प्राचार्यांच्या केबीनजवळ एक सेविका बसलेल्या होत्या. परीक्षा वरती सुरू असल्याचे त्यांनी सांगिंतले. पर्यवेक्षक दरवाजाबाहेर बेंचवर पुस्तकांचे वाचन करीत होते. तर आतमध्ये एका बेंचवर दोन विद्यार्थी बसून कॉपींची ‘अॅडजेसमेंट’ करून लिहित होते. त्यांनी चमुला ओळखले नव्हते. त्यानंतर कॉप्या कॅमेऱ्यात कैद केल्या.
कॅमेरा दिसताच धावपळ
कॅमेरा दिसताच बाहेर बसलेले पर्यवेक्षक धावत हॉलमध्ये गेले. तोपर्यंत केंद्रप्रमुखही दाखल झाले. पर्यवेक्षकांनी हॉलमध्ये जाऊन ‘कॉप्या समोर टाका, मीडियावाले आलेत’ असे सांगितले. कॉप्या समोर टाकण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली.
दरवाजात आडवा बेंच
आपल्या हॉलमधील सावळा गोंधळ कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून ‘त्या’ पर्यवेक्षकाने चक्क दरवाजातच बेंच आडवा लावला. या हॉलमध्येही कॉप्यांचा सुळसुळाट होता. बेंचखालच्या आणि विद्यार्थ्यांच्या खिशातील कॉप्या घेत खिडक्यांमधून बाहेर टाकण्यास पर्यवेक्षक व्यस्त होते. चमुला पाहताच पर्यवेक्षकाने हे थांबविले आणि बघ्याची भूमिका घेतली.
काय आदर्श घेणार?
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत शिक्षक, पोलीस आदी परीक्षार्थी आहेत. विद्यार्थी घडवणारे आणि कायद्याचे ज्ञान देणाऱ्यांकडूनच कॉपीचा वापर परीक्षेत केला जात आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढीने यांचा काय आदर्श घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. कॉप्यांचा सुळसुळाट वाढलेला असतानाही विद्यापीठ व केंद्रप्रमुख याकडे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे.
बीडमध्ये असा प्रकार घडत असेल तर गंभीर बाब आहे. कॉपी थांबविण्यासाठी आम्ही यंत्रणा तयार केली आहे. चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास निकालही थांबवू
- डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरु, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
केंद्रप्रमुखासोबत आलेल्या एका कर्मचाऱ्याने धावपळ करीत पुढच्या हॉलमधील विद्यार्थी व पर्यवेक्षकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. स्टींगने पर्यवेक्षकांना घाम फुटला.