कॉपी मुक्त पॅटर्नची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 23:47 IST2016-02-18T23:41:53+5:302016-02-18T23:47:52+5:30
नांदेड : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला गुरूवारपासून प्रारंभ झाला़ आज पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने संवेदनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची नजर होती़

कॉपी मुक्त पॅटर्नची परंपरा कायम
नांदेड : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला गुरूवारपासून प्रारंभ झाला़ आज पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने संवेदनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची नजर होती़ मात्र एकाही केंद्रावर कॉपी सापडली नाही़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त पॅटर्नची परंपरा यंदाही कायम राखण्यात प्रशासनाला यश मिळाले़
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे़ जिल्ह्यातील ६८ परीक्षा केंद्रावर २९ हजार ५९७ परीक्षार्थी पैकी २८ हजार ६०९ जणांनी परीक्षा दिली़ ९८८ विद्यार्थी गैरहजर राहिले़ इंग्रजी विषयाचा पेपर असल्यामुळे सर्व परीक्षा केंद्रावर महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली होती़ त्याशिवाय शिक्षण विभागाचे अधिकारीही लक्ष ठेवून होते़ त्यामुळे आज पहिल्या दिवशी कॉपीमुक्तीचा पॅटर्न कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी निर्माण केलेला कॉपीमुक्त जिल्हा आजही त्याच वाटेने जात आहे़
मागील पाच वर्षापासून कॉपीमुक्तीचा पॅटर्न कायम असल्याने गुणवत्तेचा आलेख वाढत आहे़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी विशेष लक्ष ठेवले आहे़ जिल्ह्यातील अतिसंवेदनश्ील केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर आहे़ विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर काही संस्थांनी केला़ परीक्षा केंद्रावर बैठे पथक निर्माण केले असून त्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ हे बैठे पथक दररोज बदलण्यात येणार आहे़ दरम्यान, आज पार पडलेल्या परीक्षेत कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही़ एकही कॉपी आढळली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)