रोडरोमिओंना नागरिकांचा चोप
By Admin | Updated: July 20, 2014 00:29 IST2014-07-20T00:09:46+5:302014-07-20T00:29:56+5:30
अंबड : विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान शहरातील नूतन वसाहत भागात घडली.

रोडरोमिओंना नागरिकांचा चोप
अंबड : विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान शहरातील नूतन वसाहत भागात घडली. नागरिकानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या पथकानेही रोडरोमिओंना नागरिकांसमोरच बेदम चोप दिल्याने शहरातील रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहे.
मागील काही काळापासून अंबड शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. शहरात शासकीय तंत्रनिकेतन, तीन वरिष्ठ महाविद्यालय, तीन कनिष्ठ महाविद्यालयांसह आठ माध्यमिक विद्यालये, बी. एड. महाविद्यालय, डी.एड.महाविद्यालय आदी विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. शहराबरोबरच बाहेर गावातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने या शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण घेत आहेत. अंबड शहर एज्युकेशनल हब म्हणून उदयास येत आहे. वाढत्या शैक्षणिक संस्थांमुळे शहरात खाजगी शिकवण्याही मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे.
शहरातील शैक्षणिक संस्थामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत असतानाच मागील काही काळात शहरात रोडरोमिओंकडून उपद्रव वाढला ओ. बसस्थानक परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, मत्स्योदरी देवी मंदिर परिसर, पाचोड नाका ते शासकीय तंत्रनिकेतन रोड, ओमशांती महाविद्यालय रोड, कोर्ट रोड, मत्स्योदरी विद्यालय व महाविद्यालय रोड आदी विविध ठिकाणी रोडरोमिओंचे घोळके विद्यार्थिनींची छेड काढतात. दुचाकीवरुन ट्रिपल सीट फिरणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, दुचाकीने विद्यार्थिनींना कट मारणे आदी प्रकार शहरात घडत आहेत. पोलिसांनी कारवाई सुरु करताच रोडरोमिओ गायब होतात. कारवाई थंडावताच पुन्हा सक्रिय होतात.
या घटनेनंतर पोलिसांनी रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)