दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहशिक्षक चतुर्भुज
By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-24T23:36:09+5:302014-07-25T00:30:37+5:30
भोकरदन : शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची (टीसी) दुसरी प्रत देण्याकरिता विद्यार्थ्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव सपकाळ येथील सहशिक्षक आर.बी. जाधव यास गुरूवारी रंगेहाथ पकडले.

दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहशिक्षक चतुर्भुज
भोकरदन : शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची (टीसी) दुसरी प्रत देण्याकरिता विद्यार्थ्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव सपकाळ येथील सहशिक्षक आर.बी. जाधव यास गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
जळगाव सपकाळ येथील विनय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक असलेल्या आर.बी. जाधव यांच्याकडे लिपिक पदाचाही कार्यभार आहे. २०१२ मध्ये याच विद्यालयातील बारावी उत्तीर्ण झालेल्या जळगाव सपकाळ येथील विद्यार्थी सतीश समाधान नेमाणे याच्याजवळील टीसी हरवली होती. त्यामुळे त्यांना टीसीची दुसरी प्रत पाहिजे होती. सतीश यांनी सहशिक्षक जाधव यांच्याकडे १६ जुलै रोजी अर्ज सादर केला. तेव्हा टीसीसाठी ५०० रुपये लागतील, असे जाधव यांनी म्हटले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने सतीशने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून यासंबंधीची लेखी तक्रार केली.
त्यानुसार आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या आवारात सापळा रचला. टीसी देण्याकरिता ५०० रुपयांची लाच स्वीकारताना जाधव यांना या पथकाने रंगेहाथ पकडले व अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पो.नि. व्ही.बी. चिंचोले, पोउपनि एस.एल. मेहत्रे, पोलिस कर्मचारी संजय उदगीरकर, गंभीर पाटील, प्रदीप उबाळे, रमेश चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. (प्रतिनिधी)