कूलर, एसी, रेफ्रिजरेटर व्हेंडरचे उत्पादन थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST2021-05-09T04:05:42+5:302021-05-09T04:05:42+5:30
औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतींमधील कूलर, वातानुकूलित यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर कंपन्यांसाठी पूरक यंत्रसामग्री तयार करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम जाणवत ...

कूलर, एसी, रेफ्रिजरेटर व्हेंडरचे उत्पादन थंडावले
औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतींमधील कूलर, वातानुकूलित यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर कंपन्यांसाठी पूरक यंत्रसामग्री तयार करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम जाणवत आहे. सध्या या उत्पादनाची विक्री बंद आहे. दुसरीकडे उद्योगांसाठी ऑक्सिजन देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे उद्योग व संबंधित व्हेंडर्स अडचणीत सापडले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्योगधंदे जास्त प्रभावित झाले आहेत. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर, कूलरची (व्हाइट गुडस्) विक्री जोरात असते. मात्र, राज्यात व राज्याबाहेरही कोरोनाची लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊन लागल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. त्याचा परिणाम, ‘व्हाइट गुडस्’ उत्पादक उद्योगांवर झाला आहे. पूर्वी औरंगाबादेत व्हिडिओकॉन कंपनीसाठी पूरक यंत्रसामग्री, आवश्यक उपकरणे तयार करणारे व्हेंडर्स मोठ्या प्रमाणात होते. अलीकडे ही कंपनी बंद पडल्यामुळे जे व्हेंडर्स होते ते शेंद्रा, वाळूज व पुण्याजवळील रांजणगाव येथील ‘व्हाइट गुडस्’ उत्पादक कंपन्यांशी जोडले गेले. या कंपन्यांकडून येथील व्हेंडर्सना मोठ्या प्रमाणात ऑर्डर असतात. सध्या शासनाने ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिल्यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. या उद्योगाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे व्हेंडर्सवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या ४० ते ६० टक्के उत्पादन क्षमतेवर हे उद्योग आले आहेत. या उद्योगांतील कामगार कमी झाले आहेत. शिफ्ट कमी झाल्या आहेत. कामाची गती मंदावल्यामुळे आठवड्यातील अवघ्या चार दिवसच हे उद्योग सुरू आहेत.
चौकट.....
उद्योगांना कामगारांची टंचाई
‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. यावेळी उद्योग पूर्णपणे बंद नसून संथगतीने सुरू आहेत. मात्र, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्योगांना कामगारांची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे बाजारपेठा बंद असल्यामुळे ‘व्हाइट गुडस्’बरोबर ऑटोमोबाइल्स उद्योगांवरही परिणाम जाणवत आहे, असे असले तरी हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.