लासूर स्टेशन आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST2021-05-13T04:06:05+5:302021-05-13T04:06:05+5:30
अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. आ. सतीश चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयात ...

लासूर स्टेशन आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा
अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आ. सतीश चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयात राजेश टोपे यांची भेट घेतली. लासूर स्टेशन येथे बाह्य व आंतररुग्ण संख्या २०० ते २५० च्या जवळपास आहे. पंचक्रोशीतील जवळपास ९० खेडेगावातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र, याठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ व सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी राजेश टोपे यांना सांगितले. नागपूर-मुंबई हायवे, नाशिक हायवे व नव्याने होत असलेला समृद्धी महामार्ग याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. महामार्गावर दुर्दैवाने आपघात झाल्यास अपघातग्रस्तांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून याठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.