उकिरड्याचे नंदनवनमध्ये रूपांतर
By Admin | Updated: November 6, 2016 01:03 IST2016-11-06T00:31:37+5:302016-11-06T01:03:55+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास

उकिरड्याचे नंदनवनमध्ये रूपांतर
औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास ठिकठिकाणी नंदनवन तयार होऊ शकते हे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. पैठणगेट येथील पार्किंगच्या जागेचा वापर मागील ३० वर्षांपासून नागरिक कचराकुंडीसारखा करीत होते. विद्यार्थ्यांनी या परिसराला सुशोभित केले.
महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा असंख्य आहेत. या जागांची देखभाल, दुरुस्ती मनपाकडून होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या या जागांचा वापर मागील काही वर्षांपासून कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच पैठणगेट येथेही पार्किंगसाठी खुली जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर अनेक नागरिक, व्यापारी कचरा आणून टाकत असत.
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने मनपाच्या खुल्या जागा विकसित करून देण्याचे आश्वासन मनपाला दिले. या कामात जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनीही योगदान देण्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून पैठणगेट येथील जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला ‘अभ्यंग’ असे नाव देण्यात आले. अवघ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी जागेचा कायापालट करून टाकला.
शनिवारी सकाळी १० वाजता महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त अय्युब खान, आर्किटेक्ट विभागाच्या विभागप्रमुख जयश्री गोगटे, प्रा. अमित देशपांडे आदींची उपस्थिती होती.