छत्रपती संभाजीनगर : दोन वाहन चालकांच्या वादातून हडको कॉर्नर येथे रविवारी रात्री १२:०० वाजता तणाव निर्माण झाला. पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथकाने वेळीच धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळून तणाव निवळला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वार दिल्ली गेटकडून हर्सूलच्या दिशेने जात होते. याचवेळी कुटुंबातील महिलांना घेऊन एक पुरुष कारमधून त्याच दिशेने जात होता. यादरम्यान रस्त्यावर दोन ते तीन वेळा कट मारल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद वाढत दोघांनी एकमेकांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यात हडको कॉर्नर परिसरात कार रस्त्याखाली जात थांबली. त्यातून कार चालक बाहेर उतरताच दुचाकीस्वार व कार चालकामध्ये वाद वाद वाढून धक्काबुक्की झाली. काहींच्या माहितीनुसार, कार चालकाला मारहाणदेखील करण्यात आली.
काही मिनिटांत जमाव जमला, रस्त्यावर तणाववाद वाढून आरडाओरडा होताच आसपासच्या परिसरातून ६० ते ८० तरुणांचा जमाव रस्त्यावर जमा झाला. तणाव वाढण्याची चिन्हे दिसताच सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, सिटीचौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी अन्य अधिकारी, अंमलदार व दंगा काबू पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत हडको कॉर्नर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चालकाचा शोध सुरूघटनेची शहानिशा करीत आहोत. सीसीटीव्ही फुटेजवरून दुचाकीचालक कोण होते, याचा शोध घेत आहोत. कार चालकाकडून माहिती घेऊन कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.