‘स्थायी’च्या बैठकीत ‘प्रोसेडिंग’वरून वादंग
By Admin | Updated: August 22, 2014 01:00 IST2014-08-22T00:22:28+5:302014-08-22T01:00:33+5:30
बीड : जिल्हा परिषदेत गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मागील प्रोसेडिंगवरुन वादंग उठले़ त्यामुळे बैठक आटोपती घेण्यात आली़

‘स्थायी’च्या बैठकीत ‘प्रोसेडिंग’वरून वादंग
स्व़ वसंतराव नाईक सभागृहात दुपारी दीड वाजता बैठकीला सुरुवात झाली़ अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती तर पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी़ एम़ ढोकणे सचिव म्हणून उपस्थित होते़ गटनेते मदनराव चव्हाण, दशरथ वनवे, महेंद्र गर्जे, शामराव राठोड यांची उपस्थिती होती़ बैठकीच्या सुरुवातीला निविदा पद्धतीने होणाऱ्या विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली़ त्यानंतर दुधाळ जनावरांच्या वाटपासाठी निवडावयाच्या लाभार्थ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धत राबविण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात आली़ १९८ लाभार्थी निवडायचे असून गटनिहाय निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे़
दरम्यान, २८ आॅक्टोबर २०१३ रोजी झालेल्या बैठकीचे ‘प्रोसेडिंग’ मिळत नसल्याच्या कळीच्या मुद्द्याला विरोधी सदस्यांनी हात घातला़ ‘प्रोसेडिंग द्या , प्रोसेडिंग’ असे म्हणत भाजपचे सदस्य आक्रमक झाले़ ‘प्रासेडिंग द्या अन्यथा बैठक चालू देणार नाही’, असा पवित्रा भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला़ त्यानंतर अध्यक्ष अब्दुल्ला यांनी बैठक रद्द करण्यास संमती दर्शवली; पण आचारसंहिता तोंडावर असल्याने बैठक रद्द करणे योग्य नाही, असा सूर भाजपातील सदस्यांनी आळवला़ ऐनवेळच्या विषयांना मान्यता दिली़
अध्यक्ष म्हणाले,
‘जीबी’त प्रोसेडिंग देणार
अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला म्हणाले, २८ आॅक्टोबर २०१३ रोजी झालेल्या बैठकीचे प्रोसेडिंग तयार आहे़ हे प्रोसेडिंग स्थायीच्या बैठकीतच द्यायचे होते;पण शक्य झाले नाही़ प्रोसेडिंग लपविले जाणार नाही़ उद्या (दि़ २२) रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मी स्वत: सर्व पदाधिकाऱ्यांना प्रोसेडिंग देणार असल्याचे त्यांनी सांगितले़ आपला कारभार उघड आहे़ खोटे काम आपण करत नाहीत, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
स्थायी समिती बैठकीपासून माध्यम प्रतिनिधींना हमखास दूर ठेवले जाते़ सदस्यांशिवाय इतरांना प्रवेश नाही असा नियम नेहमीच लावला जातो;पण गुरुवारच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या काशीबाई गवते यांचे पती बबन गवते व भाजपाच्या सदस्या साधना हंगे यांचे पती संतोष हंगे यांनी हजेरी लावली़ एवढेच नाही तर त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले़ त्यांना ना अध्यक्ष अब्दुल्लांनी हटकले ना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला़