‘डीएचओ’पदावरून वादंग!

By Admin | Updated: August 31, 2014 01:11 IST2014-08-31T00:34:57+5:302014-08-31T01:11:30+5:30

बीड : जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभारावरुन शनिवारी वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच राजकारण रंगले. अखेर प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार

Controversy over the form of 'DHO'! | ‘डीएचओ’पदावरून वादंग!

‘डीएचओ’पदावरून वादंग!


बीड : जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभारावरुन शनिवारी वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच राजकारण रंगले. अखेर प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार शनिवारी जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही. वडगावे यांनी डीएचओपदाचा एकतर्फी पदभार घेतला.
११ आॅगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग १ संवर्गातील जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांना देणे अपेक्षित होते़ मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर आंधळे यांना १४ आॅगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला़
डॉ. आंधळे हे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहेत. शिवाय क्षयरोग अधिकारीपदाचाही त्यांच्याकडे अतिरिक्त ‘चार्ज’ आहे. याबाबत १५ आॅगस्ट रोजी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले़ या वृत्तानंतर राज्याचे उपसचिव रा़ शं़ जाधव यांनी सीईओ राजीव जवळेकर यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रधान सचिव सुजाता सोहनिक यांनी सीईओ जवळेकर यांना भ्रमणध्वनीवरुन डॉ़ वडगावे यांनाच अतिरिक्त पदभार सोपविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सीईओ राजीव जवळेकर यांनी शनिवारी डॉ. वडगावे यांना डीएचओपदाचा पदभार देण्याबाबतचे आदेश काढले.
अधिकारी कोणीही असो;
पण नियम डावलायला नको!
सभापती संदीप क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, आरोग्य विभागातून सामान्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. अधिकारी कोणी का येईना;फक्त नियमाने यावा. डॉ. आंधळेंना अतिरिक्त पदभार दिला होता. डॉ. वडगावे वर्ग एकचे अधिकारी आहेत; परंतु त्यांची फाईल रितसर न फिरता थेट आदेश आले. ही पूर्ण प्रक्रिया पाहता यात पारदर्शकता दिसत नाही. त्यामुळे सीईओंच्या आदेशाला विरोध आहे. जर नियमानुसार फाईल आली असती तर आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते़ (प्रतिनिधी)

Web Title: Controversy over the form of 'DHO'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.