रिक्षांनी घेतला रस्त्यांचा ताबा
By Admin | Updated: July 11, 2014 01:04 IST2014-07-11T00:49:56+5:302014-07-11T01:04:29+5:30
औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

रिक्षांनी घेतला रस्त्यांचा ताबा
औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देश- विदेशातून पर्यटक येतात. पर्यटक शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांची प्रशंसा करतात. मात्र, शहरातील बेशिस्त आणि बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेविषयीची नाराजी त्यांना लपवता येत नाही. जागोजागी उभ्या राहणाऱ्या वाहनांनी रस्ते व्यापलेले दिसतात. सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या जालना रोडवर ठिकठिकाणी रिक्षा, अॅपेरिक्षा, काळी-पिवळी उभ्या असल्याचे दिसते. गजानन मंदिर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, शिवाजीनगर, चिकलठाणा परिसरातही हीच परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीला आणि अन्य वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
बसथांब्यांभोवती गर्दी
शहर बसथांब्यांवर रिक्षा, अॅपेरिक्षांची गर्दी दिसते. शहर बस येण्याआधीच प्रवाशांना रिक्षात बसविले जाते.
बस येण्याची वाट पाहण्यापेक्षा अनेक प्रवासीही रिक्षांनाच प्राधान्य देतात. अनेकदा बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अॅपेरिक्षांमुळे बस थांबविण्यासाठी अडचण येते. यातून बसचालक आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होते.
रिक्षांना अभय
काही रिक्षा, अॅपेरिक्षा या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होताच चालकांकडून तात्काळ मालकाची ओळख सांगून सुटका केली जाते. अॅपेरिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असून त्यांनी अभय मिळते, असे सूत्रांनी सांगितले.
अपघाताचा वाढता धोका
भर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अॅपेरिक्षा, काळी-पिवळीमुळे अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद होतात.
शहरासाठी किती रिक्षा असाव्यात याचा कुठलाच नियम पाळला जात नाही. थांबे, पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहतात. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. केवळ रिक्षांवरच कारवाई केली जाते, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस निसार अहेमद खान यांनी म्हटले.