वाळूज उद्योगनगरी जडवाहनांनी घेतला रस्त्याचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:31 IST2019-03-30T23:31:24+5:302019-03-30T23:31:32+5:30
वाळूज उद्योगनगरीत अवजडवाहनांनी रस्त्याचा ताबा घेतल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

वाळूज उद्योगनगरी जडवाहनांनी घेतला रस्त्याचा ताबा
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अवजडवाहनांनी रस्त्याचा ताबा घेतल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक कंपन्यांसमोर मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागत असल्याने अपघाताचा धोकाही बळावला आहे.
वाळूज एमआयडीसीत लहान-मोठे ३ हजारांवर कारखाने आहेत. या कारखान्यात लागणारा कच्चा व पक्क्या मालाची ट्रक, कंटेनर, टेम्पो आदी जडवाहनांतून वाहतूक केली जाते. याचबरोबर कारखान्यातून तयार होणारे साहित्य व माल विविध ठिकाणी वाहनांतून पोहचविण्यात येतात. मात्र, ही वाहने कारखान्यासमोर उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
औद्योगिक परिसरात एमआयडीसीचे कामगार चौकात बीओटी तत्त्वावर एक वाहनतळ आहे. मात्र या त्याचीही दुरावस्था झाली असून, या ठिकाणी सुविधाचा अभाव आहे. काही वाहनचालक वाहनतळाचे शुल्क वाचविण्यासाठी रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याचे चित्र औद्योगिकनगरीतील अनेक सेक्टरमध्ये पहावयास मिळते. या प्रकारामुळे इतर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जडवाहने उभी करणाऱ्यांकडे एमआयडीसी प्रशासन व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
कंपन्यासमोर जडवाहनाच्या रांगा
या भागातील आॅटो क्लस्टर, व्हेरॉक, सिमेन्स, मायलान कंपनी, गुडईअर, गरवारे गेट, एनआरबी चौक, आंबेडकर चौक, कामगार चौक आदी ठिकाणी कंपनीसमोरच जडवाहनांच्या रांगा दिसून येतात. याकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उद्योजक डॉ.शिवाजी कान्हेरे, राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने आदींनी केला आहे.
नवीन वाहनतळाचा प्रस्ताव धुळखात पडून
वाळूज उद्योनगरीत एमआयडीसी प्रशासनाकडून कामगार चौकात वाहनतळ उभारले आहे. या शिवाय बजाज आॅटोकडून कंपनीत येणाºया वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून फोस्टर कंपनीजवळ नवीन वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या नवीन वाहनतळाचा प्रस्ताव धूळखात असल्यामुळे उद्योनगरीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.