खाजगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST2021-04-09T04:02:16+5:302021-04-09T04:02:16+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक ...

खाजगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण ठेवा
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक असल्याने त्यावर विशेष लक्ष देण्याची सूचना केंद्रीय पथक प्रमुख तथा सहप्राध्यापक, जनऔषध विभाग, मध्यप्रदेशचे डॉ अभिजित पाखरे यांनी गुरुवारी येथे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पाखरे यांनी ही सूचना केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, घाटीच्या डॉ. वर्षा रोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ते अधिक प्रभावीपणे करण्याचे पाखरे यांनी बजावले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, प्रतिबंधात्मक उपाय योजना, चाचण्यांचे प्रमाण, संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, कंटेनमेंट झोन व्यवस्था यासह इतर उपाययोजनांबाबतची माहिती दिली.
शहरी भागात २६ तर ग्रामीण मध्ये ७८ कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. २० हजार खाटांच्या व्यवस्थांसह वाढीव उपचार सुविधांमध्ये पूरक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. १०४ केंद्रावर कोरोना चाचण्यांची सुविधा आहे. तसेच १३३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.
डॉ. गोंदावले यांनी, जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. “माझे आरोग्य माझ्या हाती” या ॲपची सुरुवात तसेच दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्यांची सुरुवात, शनिवार, रविवार लॉकडाऊन यासह उपाययोजनांची माहिती डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.