पालिकेवर काँग्रेसचाच ताबा ?
By Admin | Updated: July 10, 2014 01:03 IST2014-07-10T00:40:16+5:302014-07-10T01:03:45+5:30
जालना : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ जुलै रोजी होत आहे.

पालिकेवर काँग्रेसचाच ताबा ?
जालना : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ जुलै रोजी होत असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने व प्रतिस्पर्धी शिवसेनेकडे आरक्षित जागेचा उमेदवारच नसल्याने नगराध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास स्पष्ट आहे.
अडीच वर्षांसाठीचे नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे. पालिकेत एकूण ५४ नगरसेवक असून त्यात काँग्रेसचे २३, राकाँचे ८, शिवसेनेचे ९, भाजपाचे ५, मनसेचे १ तर इतर ९ असे संख्याबळ आहे. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक पापाखान उर्फ अमानुल्लाखान यांचे नुकतेच निधन झालेले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे पार्वताबाई रत्नपारखे व मालनबाई दाभाडे या तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मणकर्णा डांगे या इच्छुक आहेत. आघाडीमध्ये सर्वाधिक सदस्यांची संख्या काँग्रेसकडे असल्याने नगराध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे. त्यामुळे राकाँ उपाध्यक्ष पदावरच समाधानी असल्याचे बोलले जाते.
मागासवर्गीय महिला प्रवर्गातील उमेदवार शिवसेनेकडे नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पार्वताबाई रत्नपारखे व मालनबाई दाभाडे या दोन सदस्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात रत्नपारखे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र पक्षश्रेष्ठी कुणाला कौल देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी शहरात चर्चा सुरू आहे.