वृक्षलागवड मोहिमेला हरीतक्रांती सेनेचा हातभार
By Admin | Updated: April 9, 2017 23:19 IST2017-04-09T23:17:01+5:302017-04-09T23:19:03+5:30
बीडवनविभागाची वृक्षलागवड मोहिम तोंडावर आली असून विभागीय प्रशासन कामाला लागले आहे.

वृक्षलागवड मोहिमेला हरीतक्रांती सेनेचा हातभार
राजेश खराडे बीड
वनविभागाची वृक्षलागवड मोहिम तोंडावर आली असून विभागीय प्रशासन कामाला लागले आहे. यंदा नव्यानेच या मोहिमेला मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र हरीत सेनेच्या माध्यमातून सदस्य नोंदणी केली जात आहे. यामध्ये बीड जिल्हा राज्यात चौथ्या स्थानी असून अद्यापपर्यंत १ लाख ३३ हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे.
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साधण्यासोबतच संगोपन होणे गरजेचे आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातून ६० हजार सदस्यांचा सहभाग या मोहिमेत होणे गरजेचे होते. मात्र, तालुका पातळीवर अधिकारी-कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे उद्दिष्टापेक्षा दुपटीने सदस्यांनी सहभाग नोंदवला. विभागीय वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार वनव्यवस्थापन समिती नेमण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग राहिला आहे. यंदा वृक्षलागवडीची मोहीम आठवडाभर राहणार असून १ जुलै रोजी सुरूवात होणार आहे. १२ लाख ८२ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून वनविभागाच्या माध्यमातून सुमारे ८ लाख ८० हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय यांनाही उद्दिष्ट ठरवून दिले आहे. लागवडीपासून संवर्धनापर्यंत ग्रीन आर्मीच्या भूमिकेत हरीत क्रांतीचे सदस्य राहणार आहेत. उद्दिष्टानुसार सदस्य नोंदणी झाली असली तरी जून महिन्यात शाळा, महाविद्यालय सुरू होताच या मोहिमेत गती येणार आहे. सदस्य नोंदणीत उस्मानाबाद जिल्हा अग्रस्थानी असून लातूर, सोलापूर पाठोपाठ बीडचा क्रमांक असून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली जाणार आहे.