एक हजार वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनास हातभार
By Admin | Updated: September 16, 2014 01:32 IST2014-09-16T00:24:53+5:302014-09-16T01:32:36+5:30
बीड: झाडांची दिवसेंदिवस होत असलेली कत्तल आणि यामुळे पर्यावरणास पोहंचत असलेला धोका याचे भान लक्षात घेऊन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्नीकच्या

एक हजार वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनास हातभार
बीड: झाडांची दिवसेंदिवस होत असलेली कत्तल आणि यामुळे पर्यावरणास पोहंचत असलेला धोका याचे भान लक्षात घेऊन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात एक हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावला आहे. तसेच यावेळी रक्तदानही करण्यात आले.
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात सोमवारी अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत डिकले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता सुंदरराव लटपटे, रवि देशमुख यांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली. यामध्ये विविध प्रकारची झाडे होती. विद्यार्थ्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून साजरे केलेले उपक्रम स्तुत्य असल्याचे लटपटे यांनी सांगितले. जसे झाडे लावली तसेच त्या झाडांचे रक्षण करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यामध्ये ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉ. आर.एस. अवचरमल, डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे, दिलीप अवचरमल, धर्मराज घुले यांची उपस्थिती होती.
श्रेया वाघिरकर या एकमेव विद्यार्थिनीने रक्तदान करून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला. प्राचार्य डिकले यांनी श्रेयाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)