ठेकेदारांचे आंदोलन; युटिलिटी संकटात!
By Admin | Updated: November 3, 2016 01:34 IST2016-11-03T01:22:56+5:302016-11-03T01:34:36+5:30
औरंगाबाद : मागील महिन्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला एकानंतर एक धक्के सहन करावे लागत आहेत.

ठेकेदारांचे आंदोलन; युटिलिटी संकटात!
औरंगाबाद : मागील महिन्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला एकानंतर एक धक्के सहन करावे लागत आहेत. कंपनी या धक्क्यांमधून सावरत असतानाच बुधवारी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. १२ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित द्या म्हणून कंत्राटदारांनी चक्क ठिय्या आंदोलन केले.
शहरातील पाणीपुरवठ्याचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने पाणीपुरवठ्यासंदर्भात परिस्थिती ‘जैसे थे’ठेवा असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हा निर्णय मनपाच्या बाजूने दिला असून, शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा आमच्याच ताब्यात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कामात फक्त आम्ही कंपनीचे सहकार्य घेत आहोत, असे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांचे म्हणणे आहे. शहराचा पाणीपुरवठा, पाणीपट्टीची वसुली आता कंपनीच्या हातात नाही. त्यामुळे कंपनी यातून मार्ग काढण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यातच बुधवारी सकाळी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी युटिलिटीला आंदोलनाच्या माध्यमाने चांगलेच पाणी पाजले. जोपर्यंत थकित १२ कोटी रुपये मिळणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, अशी ताठर भूमिका कंत्राटदारांनी घेतली होती. ३६ कंत्राटदार मागील सहा महिन्यांपासून युटिलिटी कंपनीकडे पैशांची मागणी करीत आहेत. दरम्यान, दिवाळीतही पैसे न मिळाल्यामुळे आज सरळ कंपनी मुख्यालयात ठिय्याच दिला. दरम्यान, या कंत्राटदारांची समजूत काढण्यासाठी कंपनीचा मुंबईहून खास प्रतिनिधी आला. त्याने परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर कंपनीने अत्यावश्यक देणे असलेल्या कंत्राटदारांचे ६० लाख रुपये मुंबईहून मागवून दिले.