ठेकेदार पाजणार पाणी

By Admin | Updated: September 1, 2014 00:46 IST2014-09-01T00:32:54+5:302014-09-01T00:46:39+5:30

औरंगाबाद : महापालिका खाजगीकरणातून पाणीपुरवठ्याचा श्रीगणेशा उद्या १ सप्टेंबरपासून करीत आहे.

Contractor will wash water | ठेकेदार पाजणार पाणी

ठेकेदार पाजणार पाणी

औरंगाबाद : महापालिका खाजगीकरणातून पाणीपुरवठ्याचा श्रीगणेशा उद्या १ सप्टेंबरपासून करीत आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे (एएसडब्ल्यूयूसीएल) पाणीपुरवठा देखभाल, दुरुस्तीचे काम मध्यरात्रीपासून हस्तांतरित करण्यात आले आहे. उद्यापासून शहरातील पाणीपुरवठ्याप्रकरणी सर्व तक्रारी व त्यांचे निवारण, नवीन नळकनेक्शन, जलवाहिन्यांची डागडुजी, गळती दुरुस्ती, पाणीपट्टी वसुलीचे काम एएसडब्ल्यूयूसीएलचे कर्मचारी करणार आहेत. कंपनीकडे मनपाचे ३०० कर्मचारी वर्ग केले जाणार आहेत.
सप्टेंबर २०११ पासून चर्चेत असलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीच्या कामाबाबत ७ आॅगस्ट २०१४ रोजी तोडगा निघाला. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत २ हजार मि. मी. व्यासाची जलवाहिनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी टाकणार असून, कंपनीला या मार्गावर नवीन ग्राहकांना पाणी विकण्याच्या अटीवर योजनेला मंजुरी दिली. ७९२ कोटींमध्येच योजनेचे काम करण्याची अट आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घातली. वाढीव रकमेप्रकरणी तोडगा निघाल्यानंतर २३ आॅगस्ट रोजी भूमिपूजन झाले. या योजनेसाठी केंद्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे ७० कोटी रुपयांचे व्याज जमा झालेले आहे.
शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचा ताबा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि. ही संस्था १ सप्टेंबरपासून घेत आहे. कंत्राटदार संस्थेकडे योजनेचे काम २० वर्षांसाठी देण्यात आले असून, कंपनी दरमहा वीज बिलाप्रमाणे पाणीपट्टी वसूल करणार आहे. शहरात १ लाख १० हजार घरगुती नळधारक आहेत. सध्या ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी आहे.
यातील १८०० रुपये मनपाला, तर १२०० रुपये कंपनीच्या खात्यावर जमा होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी १० टक्के पाणीपट्टी वाढेल. त्यानंतर दर तीन वर्षांनी कंपनी २५ टक्के पाणीपट्टीत वाढ करील.
जे ग्राहक जास्त पाणी वापरतील त्यांना जास्त पाणीपट्टी येईल. १ सप्टेंबर २०१५ पासून नळाला मीटर बसविण्याचे काम सुरू होईल.
कंत्राटदार काय करणार?
1गळती दुरुस्त्या, पाणीपट्टी वसुली, पाणीपुरवठा करणे, मीटर बसविणे. पीपीपी मॉडेलवर योजनेचे काम होईल. २० वर्षांचा करार, १७ वर्षे देखभाल, दुरुस्ती करणार.
2वर्षातून तीन वेळेस काम पाहून मनपा निधी देणार. सध्या ४० अभियंते नेमले आहेत. ५० इतर कर्मचारी, ३ इतर कंत्राटदार नेमले आहेत. गुंठेवारी वसाहतींसाठी टँकर धोरण अजून ठरले नाही.
3सहा ठिकाणी ग्राहक तक्रार केंद्र उघडणार. जायकवाडीत मुख्यालय बांधणार, २००० मि. मी. व्यासाची २७ कि़ मी. जलवाहिनी टाकणार, १९२ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणार, १७ जलकुंभ नवीन बांधणार, हर्सूल तलावाचे नूतनीकरण, १२८९ कि़ मी. नवीन जलवाहिन्या शहरात टाकणार.
4 कंपनी १७ व्यवस्थापकीय कर्मचारी नेमेल. ६४ अभियंते, ४० सुपरवायझर, १७७ लाईनमन, ३०० मनपाचे कर्मचारी कंपनीकडे असतील. ०२४०-६६५५००० या क्रमांकावर ग्राहकांना तक्रार करता येईल.
कर्मचाऱ्यांनो निश्चिंत राहा -आयुक्त
एएसडब्ल्यूयूसीएलकडे मनपाचे ३०० कर्मचारी हस्तांतरित होणार आहेत. ते कर्मचारी मनपाच्या आस्थापनेवरच राहतील. त्यांचे वेतन फक्त कंपनी करणार आहे. कर्मचाऱ्यांची पदोन्नती व इतर देय मनपा अदा करील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी निश्ंिचत राहावे, असे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले.
समांतर योजनेचे दावे असे...
सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. १ वर्षाने दिवसाआड पाणीपुरवठा होईल. ३ वर्षांनी २४ तास पाणीपुरवठा होईल. १ सप्टेंबर २०१५ पर्यंत प्रत्येक नळाला जलमीटर बसेल. जास्त पाणी वापरणाऱ्यास जास्तीची पाणीपट्टी येईल. २०४१ सालापर्यंतच्या लोकसंख्येला ३६० द. ल. लि. पाणीपुरवठा योजनेतून होणार. ७ मीटर उंचीपर्यंत विनावीजपंप पाणीपुरवठा होईल, असे दावे मनपा व कंत्राटदार कंपनीने केले आहेत.

Web Title: Contractor will wash water