कंत्राटदार लॉबीकडून पुन्हा दबावतंत्र ?
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:41:13+5:302015-05-09T00:53:10+5:30
कळंब : तालुक्यातील मग्रारोहयो कामामधील गोंधळात ग्रामरोजगार सेवकांनी तक्रारी दाखल केल्याने आणखी भर पडली आहे

कंत्राटदार लॉबीकडून पुन्हा दबावतंत्र ?
कळंब : तालुक्यातील मग्रारोहयो कामामधील गोंधळात ग्रामरोजगार सेवकांनी तक्रारी दाखल केल्याने आणखी भर पडली आहे. यामुळे कंत्राटदार लॉबीने पुन्हा दबावतंत्राचा वापर करून ही योजनाच ‘हायजॅक’ केल्याचे चित्र दिसत आहे.
कळंब तालुक्यातील मग्रारोहयोमधील कामे नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असतात. कामे प्रत्यक्ष चालू नसताना ती चालू दाखवून मजुरांची उपस्थिती दाखविणे, मजुरांच्या नावावर पैसे उचलणे, यंत्राच्या साह्याने कामे उरकून त्या कामाची बनावट हजेरीपत्रके दाखल करणे आदी प्रकार मग्रारोहयो कामावर चालू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीवर नाही प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आल्या ना त्यांचा पंचनामा झाला. ही कामे काही काळ बंद असल्याची दाखविली जातात व पुन्हा चालू होतात.
मजूरही झाले लहरी !
लहरी हवामानाप्रमाणे तालुक्यातील मजूरही लहरी झाले की काय? असे चित्र सध्या दिसत आहे. तालुक्यात एखाद्या कामावर एका आठवड्यात मजुरांची उपस्थिती असते तर दुसऱ्या आठवड्यात ते गायब होतात. पुन्हा दोन तीन आठवड्यांनी ते कामावर हजर असल्याचे दिसते. त्यामुळे खरचं कामावर मजूर येत असतील तर त्यांची कामावर नियमित उपस्थिती का दाखविली जात नाही, हा प्रश्नच आहे.
अनेक यंत्रणांकडून मजुरांचे काम मागणी अर्जही भरून घेतले जातात. ते प्रशासनाकडे दाखल केले जातात. तरीही यंत्रणा काम चालू करीत नाहीत परिणामी मजुरांची उपासमार होते, अशी ओरड काही पक्ष संघटनांकडून केली जाते परंतु उपासमार होणारा एकही मजूर प्रशासनाकडे कधी काम मागण्यासाठी येत नाही. हेही एक गौडबंगालच आहे. (वार्ताहर)
कळंब तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत सध्या कोणतेच काम चालू नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेच तथ्य नाही. कोणी जरी खोट्या स्वरुपाची मजुरांची हजेरीपत्रके घेऊन आले तरी खातरजमा केल्याशिवाय ती दाखल करून घेतली जात नाहीत. सध्या कामेच चालू नसल्याने ती दाखल करून घ्यायचा पश्नच नाही, अशी माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.
कंत्राटदार लॉबीचा मोठा छुपा हस्तक्षेप या योजनेत असल्याचे उघड गूपित आहे या लॉबीच्या दबावाला बळी पडून ग्रामरोजगार सेवकही मजुरांची उपस्थितीपत्रके बनावटरित्या तयार करून प्रशासनाकडे देत असावीत का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामरोजगार सेवक सुधीर शेळके यांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीवरून या प्रश्नामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट होते आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामरोजगार सेवक हा दबाव झुंगारून देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.