करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

By Admin | Updated: March 22, 2017 00:32 IST2017-03-22T00:28:49+5:302017-03-22T00:32:55+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे.

Contract farming came to the aid of onion growers | करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

विशाल सोनटक्के उस्मानाबाद
सद्यस्थितीत कांद्याचा भाव ५ ते ६ रुपये किलो असा आहे. पडलेल्या भावामुळे राज्यभरातल्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने पिकांना हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र सध्या कांद्याचे भाव पडलेले असतानाही जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे.
साधारणपणे मार्च महिन्यात शेतकरी आपला उत्पादीत झालेला कांदा बाजार समितीत आणतो. या काळात एकाच वेळी मोठी आवक होत असल्याने व्यापारी संगनमत करुन कांद्याचे भाव पाडतात. आणि कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडील कांदा संपला की, मग बाजारपेठेत कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण केली जाते आणि त्यानंतर जुलै, आॅगस्टमध्ये कांद्याचे भाव वधारायला लागतात. एकदा भाव कडाडले की, चाळीत साठवलेला कांदा व्यापारी बाहेर काढून भरभक्कम नफा कमवितात. या दुष्ट चक्रामुळेच कांदा उत्पादक शेतकरी कायम अडचणीत सापडल्याचे दिसून येते. यावर मात करण्यासाठी तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने गटशेती, करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा अभिनव मार्ग शेतकऱ्यांना दाखविला आहे. याचा जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांना यंदा फायदा होणार आहे. या केंद्राने कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना या करार शेती उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कळंब तालुक्यातील गौर येथील भैरवनाथ किसान प्रोड्युसर कंपनी, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कृषी परिवर्तन कांदा उत्पादक कंपनी व उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील कृषी उन्नती कंपनीमधील सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गणेश मंडलिक यांनी वरीष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतकरी गटांचे फळ निर्र्यातदार, सिडस् कंपनी, व्यापाऱ्यांसह सेंद्रीय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांशी करार केले. राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान नाशिक तसेच कांदा व लसूण संशोधन निदर्शनालय राजगुरुनगर यांच्याशी ४३ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करार करण्यात आले. आणि या ४३ शेतकऱ्यांच्या ४३ एकरावरील क्षेत्रात कांदा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. सद्यस्थितीत बाजारपेठेत ५०० ते ६०० रुपये क्विंटलने कांदा घेतला जात असताना या शेतकऱ्यांना मात्र कराराप्रमाणे प्रति क्विंटल २५ ते ५० हजार या दराने बियाणांचा हमीभाव मिळणार आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कमालीचे पडलेले असतानाही केवळ गट व करार शेतीमुळे हे शेतकरी निर्धास्त असल्याचे दिसून आले.

Web Title: Contract farming came to the aid of onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.