वेरुळ महोत्सवात हवे सातत्य
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:20:18+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेतील वेरूळ महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईतील एलिफंटा आणि काला घोडा महोत्सव, तर मध्यप्रदेशातील खजुराहो महोत्सव आदी स्वत:च्या
वेरुळ महोत्सवात हवे सातत्य
औरंगाबाद : औरंगाबादेतील वेरूळ महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईतील एलिफंटा आणि काला घोडा महोत्सव, तर मध्यप्रदेशातील खजुराहो महोत्सव आदी स्वत:च्या शहरातील समृद्ध सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात. दरवर्षी देश- विदेशातील पर्यटक या महोत्सवाचे औचित्य साधून पर्यटनाचे नियोजन करतात. औरंगाबादचा वेरूळ महोत्सव हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून ओळखला जातो. या महोत्सवाला अस्सल चाहत्यांची उपस्थिती लाभते. हा महोत्सव दरवर्षी व्हावा, जिल्हा प्रशासनाने सातत्य ठेवावे, महोत्सवाचा दर्जा टिकून ठेवावा, अशा अपेक्षा या क्षेत्रातील जाणकार मंडळींनी व्यक्त केली आहे.
उद्देश जपला गेला पाहिजे
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा महोत्सव असल्याने महोत्सवात सातत्य असावे. ज्या उद्देशाने तो सुरू झाला तो उद्देश जपला गेला पाहिजे. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या आपल्या ऐतिहासिक शहरात वाढेल.
- दिलीप शिंदे (मुंबई)
संस्कृती टिकून राहील
महोत्सवामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव असल्याने या महोत्सवात राष्ट्रीय दर्जाचे कलाकार तयार होण्यास संधी असते. महोत्सवामुळे शहराची संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत होते, अशा महोत्सवांमध्ये खंड पडायला नको.
- विजय न्यायाधीश
समाजाने पुढाकार घ्यावा
पर्यटकांना आकर्षित करतील, अशा बऱ्याच बाबी शहरात आहेत. या स्थळांकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. जागतिक पातळीवर पर्यटन मार्केटिंग केले जावे. महोत्सव काळात पर्यटन स्थळांना भेटी देणे, पॅकेज ठरवले गेले पाहिजे.
- दत्ता जोशी
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने महोत्सवाच्या सादरीकरणाला अडथळे येत आहेत.
कला आणि संस्कृतीची जपणूक करणाऱ्या महोत्सवांमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे.
यंदाचा वेरूळ महोत्सव नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. महोत्सव हा शानदार व्हावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सवाची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महोत्सवाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकतीच कुठे घेतली जाऊ लागली असतानाच २००८ पासून हा महोत्सव बंद पडला.
या वर्षात रद्द झाला
२००८ - मुंबई हल्ला
२००९ - स्वाईन फ्लूच्या साथीमुळे (पुण्याचा सवाई महोत्सवही रद्द झाला होता.)
२०१० - शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे कारण
२०११ - २६ ते २९ जानेवारी महोत्सव
२०१३ - मराठवाड्यातील भीषण दुष्काळ