तब्बल १२ तास चालली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया !
By Admin | Updated: July 24, 2014 00:11 IST2014-07-23T23:43:03+5:302014-07-24T00:11:01+5:30
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात बुधवारी आयोजित करण्यात आलेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया तब्बल १२ तास चालली़

तब्बल १२ तास चालली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया !
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात बुधवारी आयोजित करण्यात आलेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया तब्बल १२ तास चालली़ लोकप्रतिनिधी-संघटना पदाधिकाऱ्यांसमक्ष रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत १५०० शिक्षकांचे समुपदेशन झाले़
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदोन्नती देण्यासंदर्भातचा विषय गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता़ मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात बुधवारी जिल्ह्यातील ६०० जागांसाठी १८०० शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते़ जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शिक्षणाधिकारी शंकर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीतच तब्बल १२ तास ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली़ बुधवारी पार पडलेल्या १५०० जणांच्या समुपदेशन पदवीधर पदोन्नती प्रक्रियेत अनेकांनी सोयीच्या जागा मिळाल्याने स्विकारल्या़ तर गैरसोयीची जागा मिळत असल्याचे समजताच बऱ्याच जणांनी पदवीधर पदोन्नती नाकारली़ गुरूवारी सेवा ज्येष्ठता अनुक्रमांक १५०० च्या पुढील शिक्षकांचे जि़प़च्या स्थायी समिती सभागृहात सकाळी १० वाजता समुपदेशन होणार आहे़ बुधवारी भाषा समाजशास्त्र व गणित विषयांच्या जागांचे समुपदेशन झाले़ या प्रक्रियेस उपशिक्षणधिकारी राम गारकर, कक्षअधिकारी बालाजी पाटील व आडे यांच्यासह सर्व गटशिक्षणअधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती़ दरम्यान, पदोन्नती प्रक्रियेस जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या सभापतींनी भेट दिली़ कितीही उशीर झाला तरी आजच ही प्रक्रिया पूर्ण करा अशी विविध संघटना पदाधिकारी व शिक्षकांची मागणी होती़ त्यानुसार रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली़ एवढ्या मोठ्या प्रमाणात समुपदेशन प्रक्रिया पार पाडणारा लातूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, असा दावा उपमुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी 'लोकमत'शी बोलताना केला़
कोणत्याही लोकप्रतिनिधी, संघटना पदाधिकारी व शिक्षकांच्या तक्रारीविना बुधवार झालेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया सुरळीत पार पडली़
प्रकिया पारदर्शक़़़़
शासनाच्या नियमानुसार सेवा जेष्ठतेप्रमाणे सर्वांसमक्ष पारदर्शी पध्दतीने मेहनत घेवून ही प्रक्रिया पार पडल्याने प्रशासन अभिनंदनास पात्र ठरले, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते शिवाजीराव साखरे यांनी व्यक्त केले़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांच्या अडीअडचणी समजून घेऊन ही प्रकिया पार पाडल्याने प्रशासन अभिनंदनास पात्र ठरल्याचेही साखरे म्हणाले़