पहिल्या दिवशी १६ हजार कुटुंबांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:47+5:302021-01-16T04:05:47+5:30
औरंगाबाद : राममंदिर निर्माणासाठी अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे यासाठी औरंगाबाद शहर निधी समर्पण समितीच्या वतीने श्रीराममंदिर निधी संकलन ...

पहिल्या दिवशी १६ हजार कुटुंबांशी संपर्क
औरंगाबाद : राममंदिर निर्माणासाठी अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे यासाठी औरंगाबाद शहर निधी समर्पण समितीच्या वतीने श्रीराममंदिर निधी संकलन अभियान राबविण्यात येत असून, शुक्रवारी (दि.१५) पहिल्याच दिवशी १६ हजार कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला. अभियानाची सुरुवात शहरात विविध ठिकाणी शोभायात्रांसह, पथनाट्ये सादर करून करण्यात आली. मकरसंक्रांतीपासून एक महिन्यात हे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.
शहरात २५ ठिकाणी ढोल-ताशे भजनांसह दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यानंतर संतांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होऊन निधी संकलनाला सुरुवात झाली. या अभियानाला पहिल्याच दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हापातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रत्येकी एक कार्यकर्ता किमान २० घरे असे १५ हजार कार्यकर्ते ३ लाख घरांशी संपर्क साधणार आहेत. याअंतर्गत १९० वस्त्या असून, ८८५ उपवस्त्या आहेत.
शहरात विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लहान मुला मुलींनी सहभाग नोंदवत रामायणकाळातील देखावे सादर केले. अनेक मुले लव-कुश यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. भाजीविक्रेते, दुकानदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निधी समर्पण केले. शोभायात्रेत रामभक्तांनी विविध पथनाट्ये सादर केली. साईनगर एन-६ येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह निधी संकलन समितीचे सुशील भारुका, अतुल काळे, राजीव जहागिरदार, पंकज भारसाखळे, दीपाली अनसिंगकर, शैलेश पत्की, पंकज पाडळकर ऊपस्थित होते. या अभियानात केवळ निधीच नाही, तर रामभक्तांनी त्यांचा वेळही द्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.