ग्राहक संरक्षण समितीने दिला न्याय
By Admin | Updated: December 24, 2014 01:01 IST2014-12-24T00:49:58+5:302014-12-24T01:01:48+5:30
लातूर : ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत असून या समितीकडे गेल्या ४ महिन्यांत ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़

ग्राहक संरक्षण समितीने दिला न्याय
लातूर : ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत असून या समितीकडे गेल्या ४ महिन्यांत ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ त्यापैकी ३४ तक्रारींचा निकाल लावण्यात आला असून, अन्य तक्रारी संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पैसे देऊन सेवा देणाऱ्या एजन्सीकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर ही समिती कार्यरत आहे़ दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी समितीची बैठक होऊन तक्रारीचा निकाल जाग्यावर देण्याचा प्रयत्न समितीचा राहिला आहे़
१९८६ च्या अधिनियमानुसार २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ या अधिनियमानुसारच ग्राहकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण समिती स्थापन झाली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीचे सचिव पुरवठा अधिकारी आहेत़ तर अन्य १७ सदस्य अशासकीय आहेत़ या समितीकडे ग्राहकांकडून तक्रार आल्यास त्यावर चर्चा करुन निर्णय दिला जातो़ ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधीत यंत्रणेला जबाबदार धरुन ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न समिती करते़ या समितीअंतर्गत पैसे घेऊन सेवा देणारे वेगवेगळे १० विभाग आहेत़ त्यामध्ये महावितरण, डाक विभाग, दूरसंचार मंडळ, महानगरपालिका, बँका, अन्न व औषधी प्रशासन, पुरवठा विभाग, वजन मापे आदी विभागांचा समावेश आहे़ गेल्या ४ महिन्यात तक्रारीच्या अनुषंगाने १९८६ कायद्याअंतर्गत अनेक विभागांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत़ सेवाकर घेणाऱ्या मनपालाही कचऱ्याच्याच्या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध रस्त्याबाबत तक्रार होती़ त्यासंदर्भातही ग्राहक संरक्षण समितीने नोटीस बजावली आहे, अशी माहिती जिल्हा ग्राहक सरंक्षण समितीचे अशासकीय सदस्य अॅड़ महेश ढवळे यांनी दिली़
ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्याला दाद मागण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, ग्राहक मंच, ग्राहक सल्लागार, ग्राहक आयोग या संस्था कार्यरत आहेत़ त्यांच्याकडून ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो़ शासनानेच याचे गठन केले असून, ग्राहक जागरुकता करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत़ ग्राहक जागरुकता व दिशाभूल असे घोषवाक्य निश्चित करुन २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्राहक जागरुकता सप्ताह जिल्ह्यात साजरा होणार असल्याची माहिती जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव यांनी दिली़ (प्रतिनिधी)