पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास ग्राहक मंचाचा दणका
By Admin | Updated: September 17, 2014 01:12 IST2014-09-17T00:39:00+5:302014-09-17T01:12:20+5:30
उस्मानाबाद : दोन घोड्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या लासुर्णे (ता़इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी ३ लाख, ४५ हजार रूपये

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास ग्राहक मंचाचा दणका
उस्मानाबाद : दोन घोड्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या लासुर्णे (ता़इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी ३ लाख, ४५ हजार रूपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले़
याबाबत अॅड़ सचिन देशपांडे यांनी दिलेली माहिती अशी की, आळणी येथील नानासाहेब विठ्ठल कुंभार यांनी त्यांच्या दोन घोड्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया लासुर्णे (ता़इंदापूर जि़पुणे) येथील पशुवैद्यकीय अधिकारी संजय पारडे यांच्याकडून केली होती़ मात्र, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही घोड्यांचा रक्तस्त्रावाने मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर कुंभार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून डॉ़ संजय पारडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती़ या तक्रारीनंतर येडशी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक यांनी पशुवैद्यकीय अधिकारी राजकुमार ढवळशंख यांना घोड्यांची उत्तरीय तपासणी करण्यास सांगितले होते़ मात्र, ढवळशंख यांनी तपासणीत टाळाटाळ केली़ त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे कुंभार यांनी तक्रार केली होती़ त्यानंतर कुंभार यांनी अॅड़ सचिन देशपांडे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली होती़ ग्राहक मंचापुढे आलेले पुरावे अॅड़ देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून डॉ़ पारडे यांनी कुंभार यांना दोन्ही घोड्यांच्या नुकसानभरपाई पोटी ३ लाख ४५ हजार रूपये ९ टक्के व्याजासह ४५ दिवसात द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचचे अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, सदस्य मुकुंद बी़सस्ते यांनी दिले़ तसेच पशुवैद्यकीय अधिकारी राजकुमार ढवळशंख यांनी मयत घोड्यांच्या उत्तरीय तपासणीत कर्तव्य कसूर केल्याची वरिष्ठ कार्यालयाने दखल घेवून कारवाई करावे, असेही आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)