नितीन कांबळे, कडा तालुक्यातील विविध तलाठी सज्जांचे बांधकाम चार वर्षांपासून सुरू आहे. यातील काही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इतर इमारतींचे बांधकाम अपूर्ण असल्याने पूर्ण बांधकाम झालेल्या इमारतींचेही हस्तांतरण रखडले आहे.परिणामी इमारत नसल्याने अनेक तलाठ्यांनी आपले कार्यालय शहरात थाटले आहे. यामुळे शेतकर्यांना खेटे घालण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी तलाठी सज्जा आहेत. यातील अनेक कार्यालयांना इमारत नसल्याने हे कार्यालय किरायाच्या खोलीमध्ये सुरू आहेत. तर, ग्रामीण भागात जागेचाही प्रश्न असल्याने काही तलाठ्यांनी आपले कार्यालय चक्क शहरात सुरू केले आहे. तलाठी कार्यालयांना इमारत नसल्याने तलाठ्यांसह शेतकर्यांनाही अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे. या गोष्टीचा विचार करून चार वर्षापूर्वी तालुक्यातील ४५ तलाठी सज्जांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आली. यांनतर लगेच काही ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू झाले. आतापर्यंत १५ तलाठी सज्जांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इतर इमारतींचे बांधकाम अपूर्ण असल्याने या पूर्ण झालेल्या इमारतींचेही हस्तांतरण रखडलेले आहे. यामुळे तलाठी कार्यालये जुन्याच इमारतींमध्ये सुरू आहेत. तलाठी सज्जांसाठी अनेक ठिकाणी इमारत नसल्याने काही तलाठ्यांनी आपले कार्यालय चक्क आष्टी, कडा शहरात सुरू केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले. तलाठी कार्यालये शहरात असल्याने शेतकर्यांना सातबारा, पिकांच्या नोंदी, विहिरीची नोंद, आठ अ चा उतारा काढणे आदी कामांसाठी शहर गाठावे लागत आहे. अनेकदा शेतकरी आपल्या कामानिमित्त तलाठी कार्यालय असलेल्या ठिकाणी जातात, मात्र तेथे त्यांना तलाठी आढळून येत नसल्याने शेतकर्यांना आपल्या कामासाठी वारंवार खेटे घालावे लागत असल्याचे अशोक वाघुले, संजय खंडागळे यांनी सांगितले. अनेक सज्जातील तलाठी वेळेवर हजर राहत नाहीत, इतर ठिकाणहून ये-जा करीत असल्याने शेतकर्यांची कामे वेळेवर होत नसल्याचे सचिन वाघमारे, गंगाधर खेडकर म्हणाले. अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी खाजगी ‘रायटर’ कामावर ठेवले आहेत. अनेकदा तेच तलाठ्यांची कामे करीत आहेत. हे रायटर शेतकर्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप रवि ढोबळे, सचिन वाघुले यांनी केला आहे. शेतकर्यांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी इमारतींचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून तेथे सज्जा सुरू करण्याची मागणी सचिन टकले, दादा गव्हाणे यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार राजू शिंदे म्हणाले, बांधकाम झाल्यानंतर तेथे कार्यालय सुरू करू. तर सा. बां. चे उपअभियंता पाटील म्हणाले, बांधकाम पूर्ण झाल्यावर हस्तांतर करू.
तलाठी सज्जा इमारतींचे बांधकाम रेंगाळले
By admin | Updated: May 19, 2014 01:02 IST