नव्या बसगाड्यांची बांधणी झाली ठप्प
By Admin | Updated: October 17, 2016 01:14 IST2016-10-17T00:51:19+5:302016-10-17T01:14:12+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत ९८ आयशर बसेसची बांधणी केल्यानंतर आता नव्या बसगाड्यांची बांधणी ठप्प झाली आहे.

नव्या बसगाड्यांची बांधणी झाली ठप्प
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत ९८ आयशर बसेसची बांधणी केल्यानंतर आता नव्या बसगाड्यांची बांधणी ठप्प झाली आहे. चेसीसच्या पुरवठ्याअभावी मार्चपर्यंत केवळ जुन्या बसेसच्या पुनर्बांधणीचे काम याठिकाणी चालणार आहे. महामंडळ खाजगीतून बसेस बांधून घेत आहे. त्यामुळे कार्यशाळा बंद पाडण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप एस. टी. कर्मचारी संघटनांकडून होत आहे.
एस. टी. महामंडळाच्या दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत बसेसची बांधणी केली जाते. अशोक लेलँड आणि टाटा कंपनीच्या बसगाड्यांसह आयशर कंपनीच्या बसची बांधणी याठिकाणी करण्यात आली. एकट्या चिकलठाणा कार्यशाळेत काही दिवसांपूर्वी ९८ आयशर बसेसची बांधणी झाली. ‘एसटी’च्या बांधणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा याठिकाणी आहे. परंतु तरीही महामंडळ खाजगीतून बसेस बांधणी करून घेण्यावर भर देत आहे. अशा प्रकारे सुमारे ५०० बसेस घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता कार्यशाळांना चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आल्याचे दिसते आहे. त्यामुळे कार्यशाळेत नव्या बसगाड्यांची बांधणी थांबली आहे. मार्चपर्यंत कार्यशाळेत केवळ बसेसची पुनर्बांधणीचे काम चालणार असल्याची माहिती ‘एसटी’च्या सूत्रांनी दिली. ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या बसेसचा मोठा वाटा आहे.
कार्यशाळेची क्षमता असताना बाहेरून बसेसची बांधणी करून घेतली जात आहे. चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. परंतु कार्यशाळेस कुशल मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली पाहिजे. कार्यशाळेत नव्या बसेसची बांधणी सुरू राहण्यासाठी प्रसंगी आंदोलनही केले जाईल, असे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे साहेबराव निकम म्हणाले.